मुंबई-वृत्तसेवा । जळगावसह राज्यातील महापालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून यामुळे महानगरांमध्ये रणधुमाळीला सुरूवात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने अलीकडेच राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुका घेतल्या असून याचा निकाल 21 डिसेंबर रोजी लागणार आहे. या निवडणुकीचा निकाल न्यायालयीन खटल्यामुळे पुढे ढकलण्यात आल्यामुळे महापालिका निवडणुका नेमक्या कधी जाहीर होणार ? याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. या पार्श्वभूमिवर, आज राज्य निवडणूक आयोगाने सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद घेत निवडणुकांची घोषणा केली.

राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी प्रारंभी मतदार याद्यांसह प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा सादर केला. यानंतर त्यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेची घोषणा केली. यात मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचा समावेश आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केलेल्या घोषणेनुसार राज्यातील महापालिकेच्या निवडणुकांची अधिसूचना जारी करण्यात आली असून आजपासून निवडणूक होत असलेल्या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.
याप्रसंगी दिनेश वाघमारे म्हणाले की, 29 पैकी 27 महापालिकांची मुदत संपलेली आहे. ते म्हणाले की, बृहन्मुंबई महापालिकेत एका प्रभागात एकच नगरसेवक राहणार असून तेथे एक मत द्यावे लागणार आहे. तर उर्वरित 28 महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना असून यात चार सदस्यांचा समावेश असेल. काही ठिकाणी तीन तर काही ठिकाणी चार सदस्यही असू शकतील. या सर्व महापालिकांसाठी ऑफलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. तर उमेदवारांना सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ही निवडणूक ईव्हीएमच्या मदतीने घेतली जाणार असून 1 जूलै 2025 रोजीची मतदान यादी या निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. तर संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर स्टार करण्यात आल्याचे देखील ते म्हणाले. लक्षणीय बाब म्हणजे यंदाच्या निवडणुकीत मतदानाच्या आधी 48 तास आधीच प्रचार बंद करण्यात येणार आहे.
दरम्यान, राज्य निवडणूक आयुक्त पुढे म्हणाले की, 29 महापालिकांमधील 2869 नगरसेवकांसाठी ही निवडणूक होणार आहे. या सर्व महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याची घोषणादेखील केली. यानंतर त्यांनी कार्यक्रम जाहीर केला. यानुसार, नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची दिनांक 23 ते 30 डिसेंबर 2025 असा राहणार आहे. छाननी 31 रोजी होणार असून अर्ज मागे घेण्याची मुदत 2 जानेवारी 2026 पर्यंत राहणार आहे. चिन्ह वाटप व अंतीम यादी 3 जानेवारीला होईल. मतदान 15 जानेवारी रोजी होणार असून निकाल 16 जानेवारी राहणार असल्याची माहिती दिनेश वाघमारे यांनी दिली.



