Home मनोरंजन अभिषेक–ऐश्वर्या विभक्त होणार? अखेर अभिषेक बच्चनने तोडले मौन ; चर्चांना दिला निर्णायक...

अभिषेक–ऐश्वर्या विभक्त होणार? अखेर अभिषेक बच्चनने तोडले मौन ; चर्चांना दिला निर्णायक खुलासा

0
141


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन या बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या आणि दोघेही वेगळे होण्याच्या चर्चा सोशल मीडियावर प्रचंड वेगाने पसरत होत्या. चाहत्यांपासून ते फिल्म इंडस्ट्रीपर्यंत सर्वांच्याच मनात शंका निर्माण झाल्या असताना, अखेर अभिषेक बच्चनने मौन सोडत या चर्चांवर ठोस प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या वर्षभरात अभिषेक–ऐश्वर्या यांच्या नात्यात मतभेद असल्याच्या अफवा अनेकदा समोर आल्या. विशेषत: काही महिन्यांपूर्वी अभिषेकने इन्स्टाग्रामवर घटस्फोटासंदर्भातील एका पोस्टला केलेला लाईक हा चर्चांचा मुद्दा बनला. या छोट्या कृतीने सोशल मीडियावर खळबळ उडाली आणि “काहीतरी बिनसलंय” अशा चर्चा वेगाने पसरल्या. या बातम्यांना आणखी हवा मिळाली कारण अनेक कार्यक्रमांत ऐश्वर्या केवळ लेक आराध्यासोबत दिसत होती तर बच्चन कुटुंब एकत्र क्वचितच एकाच फ्रेममध्ये दिसत होते.

यात काही माध्यमांनी तर पुढे जाऊन ऐश्वर्या राय बच्चन आपल्या आईसोबत वेगळी राहते, असेही दावे केले. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या अफवांमुळे चाहत्यांची उत्सुकता वाढलीच, परंतु बच्चन कुटुंब मात्र या सर्वांवर मौन बाळगत होता. अखेर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेक बच्चनने या सर्व चर्चांना उत्तर देत शांतता भंग केली.

अभिषेक म्हणाला, “घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत हे मला नंतर कळलं. त्याबद्दल बोलण्याची मला आवश्यकता नाही कारण मला माहीतच नाही की लोक काय बोलत आहेत. तुम्ही सेलिब्रिटी असाल तर तुमच्याबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या जातात—ज्यापैकी काहीही तथ्य नसलेल्या असतात.” त्याने पुढे सांगितले, “आमचं लग्न होण्याआधीही असंख्य अफवा पसरल्या होत्या—कधी लग्न होणार आणि झाल्यावर कधी घटस्फोट होणार, असे लोक सतत अंदाज बांधत असतात.”

अभिषेकने संताप व्यक्त करत स्पष्ट शब्दांत म्हटले, “ऐश्वर्याला माझं सत्य माहिती आहे आणि मला तिचं. आम्ही आमच्या कुटुंबात आनंदी आहोत, आणि आमच्यासाठी तेच सर्वात महत्त्वाचं आहे. कुणाला माझ्या कुटुंबाबद्दल काही बोलायचं असेल, तर त्यांना माझा सामना करावा लागेल. माझ्या कुटुंबाविरुद्ध कोणतीही चुकीची विधानं मी सहन करणार नाही.”

अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2007 मध्ये विवाह केला. 2011 मध्ये त्यांच्या संसारात कन्या आराध्याचे आगमन झाले. त्यामुळे या जोडप्याच्या वैवाहिक आयुष्याविषयीच्या अफवांना आता अभिषेकच्या स्पष्ट भूमिकेमुळे मोठा विराम मिळाल्याचे चित्र आहे.


Protected Content

Play sound