Home क्राईम चांगदेव परिसरात अवैध गावठी दारूची विक्री ; तरुणांचे भविष्य धोक्यात !

चांगदेव परिसरात अवैध गावठी दारूची विक्री ; तरुणांचे भविष्य धोक्यात !

0
118


मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव परिसरामध्ये अवैध दारू विक्रीचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाल्यामुळे स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अवैध दारूमुळे परिसरातील तरुण पिढीचे आरोग्य आणि भविष्य धोक्यात आले असल्याची गंभीर तक्रार स्थानिक नागरिक आणि पालकांनी केली आहे.

चांगदेव येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, याच भाविकांच्या गर्दीचा गैरफायदा घेत येथे खुलेआम गावठी हातभट्टी तसेच बनावट देशी दारूची विक्री सुरू आहे. काही अवैध दारू विक्रेते तर राजकीय वरदहस्त मिळाल्याच्या बळावर हा धंदा उघडपणे करत असल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

या विक्रेत्यांनी थेट नागरिकांना धमकावण्यास सुरुवात केली आहे. “आम्ही पोलिसांना पैसे देतो, आमचे दुकान बंद करण्याची कुणाची हिंमत नाही,” अशा शब्दांत विक्रेते उघडपणे धमकावत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिकांच्या मते, या अवैध दारूच्या विळख्यामुळे चांगदेव परिसरातील अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे आणि अनेक जण अजूनही त्याच मार्गावर आहेत. पालकांनी आणि ग्रामस्थांनी वारंवार याबद्दल तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी खंत व्यक्त होत आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये दारू विक्री थांबवण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे, अशी जनतेची भावना आहे. चांगदेवसारख्या धार्मिक स्थळी अशी बेकायदेशीर धंदेबाजी सुरू राहणे, ही अत्यंत लज्जास्पद बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर, संतप्त नागरिकांनी प्रशासनाकडे जोरदार मागणी केली आहे. अवैध दारू विक्रेत्यांवर तातडीने छापे टाकून कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातून केली जात आहे.


Protected Content

Play sound