यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अनास्थेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप करत पालकांनी आज अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केले आहे. शासनाच्या नियमानुसार आदिवासी विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया अर्धवट राहिल्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत.
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल अंतर्गत असलेल्या या योजनेचा लाभ तातडीने मिळावा, तसेच आपल्या पाल्यांना नामांकित इंग्रजी शाळांमध्ये शिक्षणाचा हक्क मिळावा, या मागणीसाठी आदिवासी पालकांनी अखेर हे तीव्र पाऊल उचलले आहे. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर पालकांनी उपोषणास सुरुवात केली आहे.

प्रक्रिया अर्धवट, विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात पालकांच्या म्हणण्यानुसार, प्रकल्प कार्यालयाच्या हलगर्जीपणामुळे ही प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नाही. परिणामी, शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही अनेक गरजू आणि पात्र आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळू शकलेला नाही. शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आल्याने संतप्त पालकांनी अन्नत्याग करून आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. प्रशासन जोपर्यंत या प्रक्रियेला गती देत नाही आणि विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची खात्री देत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, अशी भूमिका पालकांनी घेतली आहे.



