Home Cities जळगाव महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोदावरी कृषी संकुलात भावपूर्वक अभिवादन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोदावरी कृषी संकुलात भावपूर्वक अभिवादन


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोदावरी कृषी संकुल परिसरात विविध विभागांच्या संयुक्त उपस्थितीत भावपूर्ण अभिवादन कार्यक्रम पार पडला. भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्य, विचार आणि आदर्शांचे स्मरण करून समाजहिताच्या मूल्यांचे पालन करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला संशोधन संचालक डॉ. ए. पी. चौधरी, प्रशासकीय अधिकारी मोहन सूर्यवंशी, कृषी महाविद्यालय मुक्ताईनगरचे डॉ. सागर पाटील, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सपकाळे, तसेच उपप्राचार्य प्रवीण देवरे आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांसह तीनही महाविद्यालयांचे प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सपकाळे यांनी त्रिशरण आणि पंचशील पठण करून केली. यानंतर डॉ. शैलेश तायडे यांनी महामानवांच्या जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकत त्यांच्या संघर्ष, अभ्यासू वृत्ती, समाजपरिवर्तनासाठीच्या अपार योगदानाची आठवण उपस्थितांना करून दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांचे अनुसरण करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी सामाजिक समानता, वैज्ञानिक दृष्टिकोन, शिक्षणाचे महत्त्व आणि संविधानिक मूल्यांची जपणूक यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रनिर्माणात संविधानिक तत्त्वांचे महत्त्व पटवून देत डॉ. आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळाली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विस्तार शिक्षण विभागातील प्रा. बी. एम. गोणशेटवाड यांनी केले, तर आभार प्रा. कार्तिक खर्चे यांनी मानले.


Protected Content

Play sound