Home Cities जळगाव जळगावात वारकरी साहित्य परिषदेच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य संमेलन

जळगावात वारकरी साहित्य परिषदेच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य संमेलन

0
199

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वारकरी साहित्य परिषदेच्या १४व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे भव्य आयोजन जळगावात करण्यात आले आहे. अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे गुरुवारी (२७ नोव्हेंबर) रोजी करण्यात आले आहे. या संमेलनाची सुरुवात सकाळी ९ वाजता होणार असून जिल्ह्यातील महिला भजनी मंडळे, वारकरी दिंडी, तरुणाई आणि साहित्य प्रेमींसाठी हा सोहळा सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे.

साहित्य संमेलनात संत मुक्ताई, संत जनाई, कवयित्री बहिणाबाई यांच्या साहित्य वारशावर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दिंडीमधील गायन, वारकरी वेशभूषा, हरिपाठ, पावली या स्पर्धांमधून वारकरी परंपरेची सजीव अभिव्यक्ती रंगणार आहे. स्पर्धेत अव्वल येणाऱ्या महिला भजनी मंडळांचा विशेष सत्कार करून त्यांचा गौरव केला जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व वारकरी महिला मंडळांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या संमेलनाचे आयोजन वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक ह.भ.प श्री विठ्ठल पाटील (काका) यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून जळगाव पूर्वजिल्हाध्यक्ष गो. सेवक ह.भ.प रोहिदास महाराज वाघाडी, महिला पूर्वजिल्हाध्यक्ष ह.भ.प सरलाताई वाघ, प्रांताध्यक्ष ह.भ.प नीलाताई महाराज भिलाली, पूर्वअध्यक्ष ह.भ.प सुभाष चंद्रजी महाराज निंभोरा (ता. रावेर) तसेच महिला पश्चिम अध्यक्ष ह.भ.प मीराताई शिंगायत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम राज्यस्तरावर भक्कमपणे उभा राहिला आहे.

वारकरी साहित्य परिषद ही वारकरी संप्रदायाची परंपरा, संतवाङ्मय आणि सामाजिक मूल्ये जपण्याच्या ध्येयाने कार्यरत आहे. समाजातील तरुण-तरुणींनी व्यसनांपासून दूर राहावे, शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत, समाजात सकारात्मक विचारांचा प्रसार व्हावा यासाठी परिषदेने अनेक उपक्रम राबविले आहेत. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ‘आधार दिंडी’सारखे उपक्रमही या परिषदेमार्फत पूर्वी राबविण्यात आले आहेत.

या १४व्या वर्धापनदिनानिमित्त वारकरी साहित्य परिषदेने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संत मुक्ताई, जनाई, बहीणाई हरिपाठ स्पर्धांचे जिल्हास्तरीय आयोजन केले असून यामधून वारकरी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ग्रामीण व शहरी भागातील सर्व महिला मंडळांनी वारकरी विचारांचा वारसा आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Protected Content

Play sound