जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील गिरणा नदीतून बेसुमार वाळूचा अवैधपणे उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलीसांनी कारवाई करत ४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई भोकर ते जळगाव रोडवर करंज गावाजवळ केली असून शुक्रवारी २२ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले प्रवीण हिलाल कोळी यांच्या फिर्यादीनुसार, २० नोव्हेंबर रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास करंज गावाच्या पुढे सार्वत्रिक ठिकाणी अवैध वाळूची चोरी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, आरोपी प्रकाश रामदास काळे (वय ५८, रा. नशिराबाद) याने संगनमत करून गिरणा नदी पात्रातून सुमारे २ ब्रास वाळू चोरून टाटा कंपनीच्या (एमएच १८ बीए ४३३३) क्रमांकाच्या ट्रकमध्ये भरून चोरटी वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी तात्काळ ट्रकसह वाळूचा साठा जप्त केला. या कारवाईत ६ हजार रुपये किमतीची २ ब्रास वाळू आणि ४ लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा ट्रक असा एकूण ४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चालक प्रकाश काळे याच्याविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश हिरामण चव्हाण करीत आहेत.



