Home आंतरराष्ट्रीय दुबई एअर शोमध्ये भारतीय तेजस कोसळले; स्वदेशी तंत्रज्ञानाला मोठा धक्का

दुबई एअर शोमध्ये भारतीय तेजस कोसळले; स्वदेशी तंत्रज्ञानाला मोठा धक्का

0
114

दुबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । दुबई एअर शोदरम्यान भारतासाठी अत्यंत धक्कादायक घटना घडली असून, भारतीय बनावटीचे स्वदेशी लढाऊ विमान तेजस प्रात्यक्षिकादरम्यान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर तेजसच्या क्षमतेचे प्रदर्शन सुरू असताना अचानक झालेल्या या अपघाताने भारताच्या संरक्षण तंत्रज्ञानाला मोठा धक्का लागला आहे.

दुबईमध्ये सुरू असलेल्या एअर शोमध्ये शुक्रवारी दुपारी सुमारास प्रात्यक्षिक उड्डाणादरम्यान तेजस विमान अचानक नियंत्रणाबाहेर गेले आणि वेगाने जमिनीकडे कोसळले. स्थानिक वेळेनुसार दुपारी 2.10 वाजता घडलेल्या या अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड धूर आणि आगीचे लोट उठताना दिसले. विमान कोसळल्यानंतर लगेचच अग्निशमन आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. मात्र, विमानातील पायलटच्या स्थितीबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. त्याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

तेजस हे भारताचे पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान असून, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या विमानाला “तेजस” नाव दिले होते. भारताच्या संरक्षण उत्पादन क्षमतेचे प्रतीक म्हणून तेजसकडे पाहिले जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय एअर शोदरम्यान झालेल्या या दुर्घटनेने भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तांत्रिक बिघाड, उड्डाणातील अडथळा किंवा इतर कोणती त्रुटी यावर अधिकृत माहिती येणे बाकी आहे.

एअर शो पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमलेली प्रेक्षकांची गर्दी या घटनेने घाबरून गेली. अनेक बालकांसह उपस्थित नागरिकांना अपघाताच्या ठिकाणापासून दूर हलवण्यात आले. सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांनी संपूर्ण परिसरात बंदोबस्त वाढवत लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. आग नियंत्रणात आणण्यासाठी आणि परिस्थिती स्थिर करण्यासाठी एअरपोर्ट प्रशासनाने विशेष यंत्रणा सक्रिय केल्या आहेत.

भारतीय तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणाऱ्या तेजसच्या अपघातानंतर जगभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विमान कोसळण्यामागील कारणांचा तज्ञांकडून तपास सुरू असून, प्राथमिक पातळीवर कोणतीही अधिकृत भूमिका भारतीय किंवा दुबई प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही.


Protected Content

Play sound