Home क्रीडा जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत जळगावची निकिता पवार चमकली

जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत जळगावची निकिता पवार चमकली

0
131

जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जम्मू-काश्मीर येथे सुरू असलेल्या ६९ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू व राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती निकिता दिलीप पवार हिने दमदार खेळ करत कांस्यपदकाची श्रीमंती आपल्या खात्यात जमा केली. या उल्लेखनीय यशामुळे जळगावच्या क्रीडा विश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

निकिता पवार ही १९ वर्षांखालील मुलींच्या ५५ किलो वजनगटात जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्ट्स अकॅडमीकडून स्पर्धेत उतरली होती. तिने पहिल्या फेरीत उत्तर प्रदेशच्या तमन्ना प्रजापतीला, तर दुसऱ्या फेरीत कर्नाटकच्या संजना सामंथा हिला पराभूत करत पुढे मजल मारली. तिसऱ्या फेरीतील दिल्लीच्या दीपिकाविरुद्धचा सामना जिंकत तिने सेमी फायनलमध्ये दमदार प्रवेश मिळवला.

सेमी फायनलमध्ये लडाखच्या झारा बातुल हिच्याशी निकिताची अतिशय चुरशीची लढत झाली. तीनही फेऱ्यांत झुंजार खेळ दाखवूनही तिला पराभव स्वीकारावा लागला आणि अखेरीस कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तथापि, राष्ट्रीय स्तरावरील या भव्य स्पर्धेत तिने दाखवलेला आत्मविश्‍वास आणि चिकाटी कौतुकास्पद ठरला.

निकिता पवार ही डॉ. जी.डी. बेंडाळे महाविद्यालयात शिक्षण घेत असून जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन व जैन स्पोर्टस् अकॅडमीची खेळाडू आहे. तिला या स्पर्धेत प्रशिक्षक अजित घारगे यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, खजिनदार सुरेश खैरनार, सचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला.

निकिताच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे जळगाव जिल्ह्याची राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील उपस्थिती अधिक ठळक झाली असून तिच्या पुढील कारकिर्दीसाठी क्रीडाप्रेमींनी आशावाद व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound