वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मोठी राजकीय घडामोड घडली असून शहरात निवडणुकीचे वातावरण प्रचंड तापले आहे. नगराध्यक्ष पदासाठी तब्बल १५ तर नगरसेवक पदासाठी १५१ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची नोंद झाली आहे. भाजपमधील नाराज दिग्गजांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) गळाला लागून तेथून उमेदवारी दाखल केल्याने वरणगावच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे.
वरणगावात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांनी शक्तीप्रदर्शन करत भव्य रॅली काढत उमेदवारी दाखल केली. अखेरच्या दिवशी भाजपच्या वतीने श्यामल अतुल झांबरे यांनी नगराध्यक्ष पदासाठी तर इतर २१ उमेदवारांनी केंद्रीय क्रीडा मंत्री खा. रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत आपले अर्ज सादर केले. भाजपचे काही वरिष्ठ व नाराज चेहरे अचानक शिवसेनेकडे वळल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. माघारीनंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल, मात्र सध्याच्या घडामोडींमुळे निवडणुकीत चुरस मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

या निवडणुकीत मोठ्या संख्येने उमेदवारी दाखल झाल्याने प्रक्रिया अत्यंत गतीमान झाली. नियमाप्रमाणे उमेदवारांना घरपट्टी, पाणीपट्टी तसेच विविध करांची थकबाकी भरावी लागते. या पार्श्वभूमीवर शहरातील उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर करभरणा केली असून नगर परिषदेच्या तिजोरीत तब्बल ४० लाख रुपयांची भर पडली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महसुलात वाढ झाल्याने प्रशासनात समाधान व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, पाच वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाल्याने शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. शक्य असलेल्या आर्थिक उलाढालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने विशेष भरारी पथके तैनात केली आहेत. पोलीस प्रशासन आणि नगर परिषदेच्या संयुक्त पथकांनी शहराच्या चारही प्रवेशद्वारांवर नाकेबंदी केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून उपद्रवींकडे करडी नजर ठेवली जात आहे.
अखेरच्या दिवशी झालेल्या अर्ज दाखल प्रक्रियेने वरणगावातील निवडणूक अधिक रोमहर्षक झाली असून येत्या दिवसांत माघारीनंतरचे अंतिम चित्र कोणत्या दिशेने झुकते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.



