
जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातर्फे आज आकाशवाणी चौकातील सर्कलमध्ये प्रतीकात्मक आंदोलन छेडण्यात आले. सर्कलमध्ये वाढलेल्या गवतामुळे आणि साचलेल्या कचऱ्यामुळे निर्माण झालेल्या अस्वच्छतेबाबत आवाज उठवत आंदोलनकर्त्यांनी प्रत्यक्ष गवतावर तननाशक फवारणी करून प्रशासनाला जाग येण्याचे प्रयत्न केले.

गेल्या अनेक दिवसांपासून आकाशवाणी चौकातील सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात गवत उगवलेले असून परिसरात कचरा साचत आहे. तसेच सर्कल मोडकळीस आल्याने तेथे अस्वच्छ वातावरण तयार झाले आहे. या परिस्थितीकडे महानगरपालिका आणि नॅशनल हायवे अथॉरिटीने सतत दुर्लक्ष केल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला. या निषेधार्थ गवतावर पंपाद्वारे तननाशक फवारून तसेच साचलेला कचरा बाजूला करून पक्षाने प्रतिकात्मक आंदोलन केले.
आंदोलनाच्या वेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिका आणि एनएचएआय अधिकाऱ्यांच्या कामचुकार भूमिकेबद्दल जोरदार घोषणाबाजी केली. पुढील काळात या ठिकाणी नियमित स्वच्छता, गवत वाढू नये यासाठी उपाययोजना आणि सर्कलचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यासोबतच इच्छा देवी चौक आणि अजिंठा चौकातील सर्कल देखील याच धर्तीवर स्वच्छ करून योग्य देखभाल करावी, असे आवाहन करण्यात आले.
आंदोलनात शहराध्यक्ष इजाज मलिक, कार्याध्यक्ष संग्राम सूर्यवंशी, माजी अध्यक्ष अशोक लाडवांजारी, सचिव सुनील माळी, युवकाध्यक्ष रिक्कु चौधरी, विद्यार्थी अध्यक्ष गौरव वाणी, उपाध्यक्ष किरण राजपूत, कलाबाई शिरसाट, माजी नगरसेवक राजीव मोरे, दुर्गेश पाटील, रहीम तडवी, मतीन सय्यद, गौरव डांगे, अखिल पटेल यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



