नागपूर–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त नागपूरमध्ये आज आयोजित राज्यस्तरीय जनजाती गौरव दिवस सोहळा उत्साहात पार पडला. सांस्कृतिक समृद्धीचे दिमाखदार प्रदर्शन, लघुचित्रपट स्पर्धा, डॉक्युमेंट्री आणि आदिवासी नृत्यांच्या रंगतदार स्पर्धांनी कार्यक्रमाला विशेष ऊर्जाभरित वातावरण मिळाले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या खान्देशातील कलावंतांनी आपल्या दर्जेदार कलाकृतीमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत राज्यात आपला ठसा उमटवला आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीने सोहळ्याला अधिक भव्यता लाभली. राज्यभरातून आलेल्या कलाकार, विद्यार्थ्यांनी आणि आदिवासी समाजातील प्रतिनिधींनी या दिवशी आपला सांस्कृतिक वारसा मोठ्या अभिमानाने सादर केला.

या विशेष सोहळ्यात आयोजित लघुचित्रपट स्पर्धेत खान्देशातील कलावंतांनी अवघ्या महाराष्ट्रातून आलेल्या सुमारे 300 स्पर्धकांवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला. ‘आदिवासी आणि निसर्ग’ या विषयावरील या उत्कृष्ट लघुपटाने परीक्षकांचे आणि प्रेक्षकांचे मन जिंकले. या लघुचित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका ही बहुमुखी कलावंत प्रदीप चुडामन भोई यांनी प्रभावीपणे साकारली आहे. त्यांच्या अभिनय आणि दिग्दर्शनशैलीत आदिवासी संस्कृतीची सहजता आणि निसर्गाशी असलेले नाते प्रभावीपणे जाणवले.
महिला मुख्य भूमिकेत शीतल नितीन नेवे यांनी पत्रकाराची भूमिका अप्रतिमपणे साकारत लघुपटाला वास्तववादाची छटा दिली. सचिन सोनवणे आणि चिंचपाडा गावातील काही स्थानिक आदिवासी कलाकारांनीही भूमिकांद्वारे कथानकाला प्रभावी स्वरूप दिले. तांत्रिक बाजू समर्थपणे सांभाळत चित्रीकरण आणि संकलनाची जबाबदारी दीप्तेश सोनवणे यांनी पार पाडली. सातपुडा पर्वताची नैसर्गिक शोभा आणि चोपडा तालुक्यातील चिंचपाडा गावातील चित्रीकरणामुळे लघुपटाला खास देखणेपण लाभले.



