Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगरमध्ये निवडणुकीचा माहोल तापला ; प्रभाग क्रमांक 13 मध्ये उमेदवारीची चुरस 

मुक्ताईनगरमध्ये निवडणुकीचा माहोल तापला ; प्रभाग क्रमांक 13 मध्ये उमेदवारीची चुरस 

0
352

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. विशेषत: प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेना (शिंदे गट) तर्फे तिन्ही उमेदवारांनी जोरदार तयारीला सुरुवात केल्याने पक्षात उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे.

अद्याप कोणत्याही उमेदवाराने अधिकृतपणे नामांकन अर्ज दाखल केलेला नसला तरी, पक्षात उमेदवारी निश्चित करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसारच अंतिम उमेदवार निश्चित होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे पक्षातील तिन्ही इच्छुक उमेदवार कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवत असून, आपल्या बाजूने हवा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

या तिन्ही उमेदवारांमध्ये सुशिक्षित, कार्यतत्पर आणि स्थानिक पातळीवर जनसंपर्क मजबूत असलेली मंडळी आहेत. त्यामुळे त्यांच्या दावेदार्‍यांबद्दल शहरात जोरदार चर्चा रंगली आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या क्षेत्रातील विकासकामे, सामाजिक योगदान आणि लोकांशी असलेल्या सुसंवादाचा दाखला देत तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

प्रभाग क्रमांक 13 हा मुक्ताईनगरमधील सर्वात मोठ्या प्रभागांपैकी एक आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि नालेसफाई या प्रमुख समस्या येथे कायम आहेत. त्यामुळे या प्रभागातून निवडून येणाऱ्या उमेदवाराला नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करत विकासकामांना गती देण्याचे मोठे आव्हान स्वीकारावे लागणार आहे.

दरम्यान, शहरातील नागरिक आता कोणाला संधी मिळते आणि कोण या प्रभागाचा ताबा मिळवतो याकडे उत्सुकतेने पाहत आहेत. येत्या काही दिवसांत उमेदवारीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर या प्रभागातील निवडणूक रंगत आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.


Protected Content

Play sound