देशभरात खळबळ! मुंबईसह पाच विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी 

0
111


मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । दिल्लीतील बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर अजूनही देशाची सुरक्षा यंत्रणा तणावात असतानाच, पुन्हा एकदा देशभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. इंडिगो एअरलाईन्सला आलेल्या धमकीच्या मेलमुळे मुंबईसह देशातील पाच प्रमुख विमानतळांवर हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, त्रिवेंद्रम आणि हैदराबाद या आंतरराष्ट्रीय विमानतळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने सुरक्षा यंत्रणांनी तातडीने चौकशी सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो एअरलाईन्सला आज दुपारी साडेतीन वाजता हा धमकीचा ईमेल प्राप्त झाला. या मेलमध्ये देशातील पाच आंतरराष्ट्रीय विमानतळांवर बॉम्बस्फोट करण्याचा इशारा देण्यात आला आहे. हा मेल कुठून आणि कोणाकडून पाठवण्यात आला याचा शोध सायबर सुरक्षा विभाग आणि गुप्तचर यंत्रणा घेत आहेत. या घटनेनंतर सर्व संबंधित विमानतळांवर अतिरिक्त सुरक्षा तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

या घटनेनंतर एअर इंडिया एक्सप्रेसच्या वाराणसीकडे जाणाऱ्या विमानालाही बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. त्यामुळे मुंबईहून निघालेल्या या विमानाचे वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्यानंतर बॉम्ब निकामी पथकाने विमानाची कसून तपासणी केली, मात्र आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही.

एअर इंडिया एक्सप्रेसने या घटनेवर अधिकृत निवेदन जारी केले असून, “वाराणसीला जाणाऱ्या आमच्या विमानाला धमकी मिळताच सरकारने नियुक्त केलेल्या बॉम्ब धोक्याचे मूल्यांकन समितीला तातडीने कळविण्यात आले. सर्व सुरक्षाविषयक उपाययोजना राबवण्यात आल्या असून, सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत,” असे प्रवक्त्याने स्पष्ट केले.

दरम्यान, दिल्ली बॉम्बस्फोटानंतर देशातील सर्वच प्रमुख विमानतळांवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सीआयएसएफ आणि विमानतळ पोलिस दलाला उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आले असून, श्वान पथके आणि बॉम्ब निकामी पथके विमानतळ परिसरात तैनात आहेत. विमानतळांच्या प्रवेशद्वारांवर आणि बॅगेज तपासणी कक्षांमध्ये काटेकोर तपासणी सुरू आहे. सुरक्षा यंत्रणा कोणताही धोका टाळण्यासाठी अत्यंत सजग आहेत.