
जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथे रिक्षातील प्रवाशांचे खिसे कापून चोरी करणाऱ्या दोन रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी जळगावचे रहिवासी असून, गुन्ह्यात वापरलेली रिक्षाही पोलिसांनी जप्त केली आहे.

बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) कोतवाली पोलीस स्टेशन येथे रिक्षात प्रवासी बसवून त्यांचे खिसे कापून चोरी केल्याचा गुन्हा दाखल होता. स्थानिक गुन्हे शाखा, जळगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना खात्रीशीर गोपनीय बातमी मिळाली की, हा गुन्हा जळगाव येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार वसीम कय्युम खाटीक (रा. मास्टर कॉलनी) आणि तौसीफ सत्तार खान (रा. रामनगर) यांनी त्यांच्या साथीदारांसह केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री. गायकवाड यांनी तातडीने पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय आणि गुप्त माहितीदारांच्या साहाय्याने वसीम खाटीक (वय ३३) आणि तौसीफ खान (वय ३६) या दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे बऱ्हाणपूर येथील गुन्ह्याबद्दल कसून चौकशी केली असता, त्यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी बऱ्हाणपूर कोतवाली पोलीस स्टेशनच्या पथकाच्या स्वाधीन केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस अंमलदार अतुल वंजारी, अकरम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, प्रविण भालेराव, किशोर पाटील, रविंद्र कापडणे, राहुल रगडे, नाना तायडे आणि महेश सोमवंशी यांनी केली.



