Home Cities यावल डॉ. मेत्ता ढाले यांची वैद्यकीय क्षेत्रात गरुडभरारी! 

डॉ. मेत्ता ढाले यांची वैद्यकीय क्षेत्रात गरुडभरारी! 

0
162

यावल–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या डोंगर कठोरा या गावातील कन्या डॉ. मेत्ता मिलींद ढाले यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या जिल्ह्याचे नाव गौरवाने उजळवले आहे. त्यांनी नुकतीच ‘पॅथॉलॉजी’ या वैद्यकीय शाखेत मास्टर डिग्री संपादन करून आपल्या कर्तृत्वाची नवी ओळख निर्माण केली आहे. या यशामुळे तायडे आणि ढाले कुटुंबासह संपूर्ण डोंगर कठोरा ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

डॉ. मेत्ता ढाले या सन्मानीय सिताराम सुका तायडे यांचे नात आणि आयुर्वेदाचार्य पितांबर सिताराम तायडे व डॉ. डिगंबर सिताराम तायडे यांच्या कुटुंबातील कन्या आहेत. त्यांचे वैद्यकीय शिक्षण डावणगेरे येथील जेजेएम मेडिकल कॉलेजमध्ये पूर्ण झाले. नुकत्याच झालेल्या पदव्युत्तर पदवीदान समारंभात त्यांनी पॅथॉलॉजी विषयातील मास्टर डिग्री प्राप्त केली. हा गौरवशाली क्षण त्यांना जेजेएम मेडिकल कॉलेजचे पॅथॉलॉजी विभाग प्रमुख तसेच मणिपाल इन्स्टिट्यूट आणि हॉस्पिटल चेनचे प्रमुख (बेंगळुरू) यांच्या हस्ते लाभला.

कोविड-१९ महामारीच्या काळात डॉ. मेत्ता ढाले यांनी जीवाची पर्वा न करता रुग्णसेवेत स्वतःला झोकून दिले होते. त्यांच्या या सेवेची नोंद स्थानिक वैद्यकीय समाजात अभिमानाने घेतली जाते. वैद्यकीय क्षेत्रात मास्टर डिग्री मिळवणाऱ्या तायडे व ढाले परिवारातील त्या पहिल्या मुलगी ठरल्या आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशामागे आई डॉ. अनिता (तायडे) ढाले आणि वडील मिलींद ढाले यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

डॉ. मेत्ता ढाले या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व डॉ. डिगंबर तायडे यांच्या भाची आहेत. डॉ. तायडे यांना “पद्मश्री २०२६” नामांकनासह “आंतरराष्ट्रीय प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व पुरस्कार २०२५” यांसारखे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी समाजसेवा, संगीत आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पन्नासहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ट्रॉफी, पदके व सन्मानपत्रे मिळवली आहेत. त्यांच्या बरोबरीने कार्यरत असलेल्या समाजसेविका आणि गायिका शकुंतला तायडे या डॉ. मेत्ता ढाले यांच्या आत्या असून, त्यांच्या प्रेरणेतूनच मेत्ता यांनी वैद्यकीय क्षेत्रात आपले स्वप्न साकार केले आहे.

या अभूतपूर्व यशाबद्दल डॉ. मेत्ता ढाले यांचे नातेवाईक, आप्तस्वकीय, मित्रपरिवार आणि डोंगर कठोरा ग्रामस्थांनी हार्दिक अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठीही एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.


Protected Content

Play sound