

रावेर–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर नगर परिषद निवडणुकीत यंदा सर्वाधिक चर्चेत राहणारा प्रभाग म्हणजे शहरातील प्रभाग क्रमांक पाच. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या प्रभागात विविध समाजघटक, धार्मिक समुदाय आणि राजकीय गट एकत्र येत असल्याने येथील निवडणूक बहुरंगी आणि रोचक ठरणार आहे. विशेष म्हणजे या प्रभागात धार्मिक ध्रुवीकरणाची छाया पडण्याची शक्यता व्यक्त होत असून मतदार कोणाच्या बाजूने कल झुकवतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
या प्रभागात दोन जागा असून त्यापैकी एक जागा अनुसूचित जाती (एससी) साठी राखीव असून दुसरी सर्वसाधारण महिला जागा आहे. सर्वसाधारण महिला जागेसाठी भाजपकडून विद्या अरुण शिंदे यांनी इच्छुक म्हणून दावा केला आहे, तर अपक्ष म्हणून छायाबाई ज्ञानेश्वर महाजन, संगीता शिरीष वाणी, अंजली प्रमोद महाजन आणि सालिया खान या महिला रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. दुसरीकडे, एससी राखीव जागेसाठी भाजपकडून हेमलता अजिंक्य वाणी (निंभोरे) या इच्छुक असून पिंटू वाघ, पंकज वाघ, सावन मेढे यांची आई सुशिलाबाई मेढे आणि अमन रील या उमेदवारांनी देखील रस दाखवला आहे. त्यामुळे येथील निवडणूक “काँटे की टक्कर” ठरणार यात शंका नाही.
प्रभाग क्रमांक पाचमध्ये एकूण ३,२४० मतदार असून त्यापैकी सुमारे १,१०० मतदार मुस्लिम समाजाचे आहेत. तसेच ९०० मतदार अनुसूचित जातीचे असून उर्वरित १,२६० मतदार इतर घटकांमधील आहेत, जे या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. या प्रभागात दत्त मंदिर परिसर, डेली भाजी मार्केट भाग, अग्रसर चौक, नालाभाग, बावीशी गल्ली, रिंग रोड, पंचशील नगर, इमामवाडा आणि कोतवाल भाग समाविष्ट आहेत. त्यामुळे या भागातील दत्त महाराज नेमके कोणाला ‘पावतात’, याकडे देखील मतदार आणि कार्यकर्त्यांचे विशेष लक्ष आहे.
आमच्या स्थानिक प्रतिनिधींनी प्रभाग क्रमांक पाचमध्ये फेरफटका मारला असता, नागरिकांमध्ये उत्साह आणि कुतूहल दोन्ही जाणवले. काही नागरिकांनी धार्मिक ध्रुवीकरण या वेळी प्रभाव टाकेल, असे स्पष्ट केले, तर काही मतदारांनी विकासकामांच्या मुद्यावर मतदान करणार असल्याचे सांगितले. काहींनी तर पुढील पाच वर्षांत विकासाचा ठोस आराखडा सादर करणाऱ्या उमेदवारालाच मत देणार असल्याचे मत व्यक्त केले.
दरम्यान, या प्रभागात प्रभावशाली व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे अनिलशेठ अग्रवाल, डॉ. शब्बीर शेख, अनंत अकोले आणि राजेंद्र अटकाळे यांच्या भूमिकांवरही विजय-पराजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. त्यांच्या पाठिंब्याचा कल ज्या उमेदवाराकडे झुकेल, त्याच्या विजयाची शक्यता अधिक असल्याचे स्थानिक राजकीय तज्ञांचे मत आहे.
या सर्व घडामोडींमुळे रावेर नगरपरिषद निवडणुकीतील प्रभाग क्रमांक पाच हा आगामी काही दिवसांमध्ये सर्वांच्या चर्चेचा विषय ठरणार असून, येथे कोण बाजी मारते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



