Home Cities जळगाव जळगावात उद्यापासून श्री गौकृपा कथेचे आयोजन

जळगावात उद्यापासून श्री गौकृपा कथेचे आयोजन

0
163

जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात प्रथमच श्री गौकृपा कथेचे भव्य आयोजन होत असून, या अनोख्या आध्यात्मिक सोहळ्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. पांजरपोळ संस्था, जळगाव यांच्या वतीने आणि जळगाव माहेश्वरी महिला मंडळाच्या सहयोगाने गौतीर्थ पांजरपोळ, नेरीनाका येथे ११ ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दुपारी ३ ते ६ या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे. शहरातील नागरिक, महिला मंडळे, तरुणाई आणि बालकांनीही या कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या भव्य श्री गौकृपा कथेकरिता साध्वी कपिला गोपाल सरस्वती दीदीजी यांचे जळगावात आगमन झाले आहे. संगणक अभियांत्रिकीची (बी.टेक) पदवी प्राप्त करून मोठ्या पगाराची नोकरी आणि संसार यांचा त्याग करून त्यांनी आपले आयुष्य गाईंच्या सेवेसाठी आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी वाहिले आहे. देशभरातील अनेक गाशाळांमध्ये गाईंची सेवा, गोवैद्यकीय उपचार आणि गौसंवर्धनाचे कार्य त्यांनी आरंभले असून, आतापर्यंत त्यांनी ४०० पेक्षा अधिक गौकथा, गौराम कथा, भागवत कथा आणि नानी बाई का मायरा सारखे धार्मिक कार्यक्रम केले आहेत.

केवळ ३१ वर्षांच्या वयात दीदीजींनी आध्यात्मिकतेचा मार्ग स्वीकारून अकरा वर्षांपासून अन्नत्याग, मोबाईलविरहित जीवन, पायात चप्पल न घालणे, पूर्ण शाकाहारी जीवनपद्धती आणि गोउत्पादनांवर आधारित आहाराचा स्वीकार केला आहे. व्यसनमुक्ती आणि शारीरिक व्याधी निवारणासाठीही त्या देशभरात कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना नवसंजीवनी मिळाली आहे.

विशेष म्हणजे, साध्वी कपिला गोपाल सरस्वती दीदीजी या मूळच्या जळगावच्या असून त्यांनी प्राथमिक शिक्षण आर.आर. विद्यालयात घेतले, तर अभियांत्रिकीचे शिक्षण बांभोरी येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पूर्ण केले आहे. आपल्या गावातूनच ज्ञान, संस्कार आणि अध्यात्माची वाटचाल सुरू करून त्यांनी संपूर्ण देशभरात ‘गोकृपा’चा संदेश पोहोचवला आहे.

या कथेच्या निमित्ताने पांजरपोळ संस्थेचे परिसर दिव्य वातावरणाने न्हाऊन निघणार आहे. कथा कालावधीत भक्तगणांसाठी विविध धार्मिक कार्यक्रम, आरती व गौसेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजक मंडळाकडून सर्व नागरिकांना उपस्थित राहून या अलौकिक कथेचा लाभ घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound