Home Cities जळगाव ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्ष महोत्सवात भगीरथ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सहभाग 

‘वंदे मातरम्’च्या १५० वर्ष महोत्सवात भगीरथ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सहभाग 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील प्रेरणास्थान ठरलेल्या ‘वंदे मातरम्’ या गीताच्या १५० वर्ष पूर्णत्वानिमित्त जळगाव पोलिस कवायत मैदानावर आयोजित भव्य सोहळ्यात कै. सुनीता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला. देशभक्तीच्या सुरांनी भारलेल्या या वातावरणात विद्यार्थ्यांनी आपल्या आवाजात मातृभूमीप्रति अपार प्रेम आणि अभिमान व्यक्त केला.

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेले ‘वंदे मातरम्’ हे केवळ गीत नव्हे, तर कोट्यवधी भारतीयांसाठी स्वातंत्र्याची प्रेरणा ठरलेला एक मंत्र आहे. या गीताच्या १५० वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात भगीरथ इंग्लिश स्कूलच्या इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी वंदे मातरम् सादर करताना सभोवताली उपस्थित सर्वांना देशभक्तीच्या भावनांनी भारावून टाकले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी  रोहन घुगे, पोलिस अधीक्षक  महेश्वर रेड्डी, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, तहसीलदार सौ. शितल राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान वंदे मातरम् गीताचा इतिहास आणि त्याचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान या विषयावर माहितीपर नाटिका सादर करण्यात आली, ज्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

भगीरथ शाळेच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात पूर्ण मनोभावे ‘वंदे मातरम्’ गायले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी संकल्प केला की, पुढे रोज सकाळी वंदे मातरम् म्हणण्यासोबतच आपल्या आई-वडिलांनाही आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनाही या राष्ट्रगीताच्या उच्चारात सामील करणार. हा उपक्रम शाळेच्या देशभक्तिपूर्ण मूल्यांच्या जडणघडणीसाठी महत्त्वाचा ठरला.

या वेळी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक के. टी. चौधरी, डॉ. व्ही. एस. पाटील, सौ. आर. जी. सपकाळे, सौ. पी. जी. पाटील, हरित सेना प्रमुख एस. ए. बाविस्कर, के. पी. पाटील, आदर्श शिक्षक किरण पाटील आणि आर. डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांच्या देशप्रेमाने भारलेल्या सहभागाचे कौतुक केले आणि त्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.


Protected Content

Play sound