
मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संत मुक्ताईच्या पवित्र भूमीत दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालविकास केंद्र, त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र पादुकांचे आगमन होताच संपूर्ण मुक्ताईनगर भक्तीमय वातावरणाने न्हाऊन निघाले. कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळीच्या पवित्र दिनानिमित्त नवीन संत मुक्ताई मंदिर परिसरात आयोजित या सोहळ्याने भक्तांच्या हृदयात नवी ऊर्जा आणि श्रद्धेचा संचार केला.

५ नोव्हेंबर २०२५ रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र पादुकांचे मुक्ताईनगर येथे आगमन झाले. या आगमनाचे औचित्य साधून नवीन संत मुक्ताई मंदिरात भक्तिभावाने तुळशी विवाह सोहळा पार पडला. मंदिर परिसर भक्तांनी, सेवेकरी भगिनींनी आणि महिला मंडळांनी ओसंडून वाहत होता. भजने, कीर्तन, आरत्या आणि नामस्मरणाच्या गजरात भक्तीचा महासागरच ओसंडून वाहत होता.
६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी श्री स्वामी समर्थांच्या पवित्र पादुकांची भव्य मिरवणूक नवीन मुक्ताई मंदिरापासून श्री स्वामी समर्थ केंद्र, जुने गाव मुक्ताईनगर येथे नेण्यात आली. पालखी मार्ग फुलांनी, रांगोळ्यांनी आणि भगव्या पताकांनी सजविण्यात आला होता. मार्गभर भाविकांनी “जय जय स्वामी समर्थ!” च्या गजरात पादुकांचे स्वागत केले. आरत्या, फुलवर्षाव आणि भक्तिगीतांनी वातावरण दुमदुमून गेले होते.
या पादुका मिरवणुकीत असंख्य सेवेकरी बांधव, भक्त, महिला मंडळे आणि नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले. भक्तांना सोयीसाठी स्थानिक सेवेकरी नितीनकुमार जैन यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून प्रशंसनीय सेवा बजावली. त्यांच्या या सेवेबद्दल भाविकांनी कृतज्ञता व्यक्त केली.
हा संपूर्ण सोहळा भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा एक अद्भुत संगम ठरला. मुक्ताईनगर नगरीत या पवित्र प्रसंगाने केवळ धार्मिक आनंद नव्हे, तर सामाजिक एकतेचाही सुंदर संदेश दिला. संत परंपरेचा दिव्य वारसा या पादुका सोहळ्याच्या माध्यमातून पुन्हा उजळून निघाला आणि भाविकांच्या अंत:करणात नव्या श्रद्धेचा दीप प्रज्वलित झाला.



