मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना मुंबईतील भांडूप येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून आणि माध्यमांपासून दूर होते. वैद्यकीय तपासण्या आणि आवश्यक उपचार सुरू असतानाच राऊत यांनी रुग्णालयातूनच एक फोटो शेअर करत आपली जिद्द आणि पत्रकारधर्माची ओळख पुन्हा अधोरेखित केली आहे.
संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ते रुग्णालयातील बेडवर बसलेले दिसतात. त्यांच्या हातावर सलाईन लावलेले असून, ते एका हातात कागद आणि पेन धरून काहीतरी लिहिताना दिसत आहेत. त्यांच्या समोर ठेवलेल्या कागदावर “एडिट” असे लिहिल्याचे दिसल्याने अनेकांनी अंदाज वर्तवला की, राऊत हे रुग्णालयात असूनही ‘सामना’चे अग्रलेख लिहित आहेत.

या ट्विटसोबत संजय राऊत यांनी लिहिले —
हात लिहिता राहिला पाहिजे. कसेल त्याची जमीन, लिहील त्याचे वृत्तपत्र — हा आमच्या पिढीचा मंत्र होता!”
या वाक्यांमधून त्यांच्या मनातील लेखणीप्रेम, विचारशीलता आणि कार्यप्रवण वृत्ती स्पष्टपणे दिसून आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राऊत यांच्या आरोग्याबाबत चर्चा सुरू होती. वैद्यकीय कारणांमुळे ते सार्वजनिक जीवनापासून दूर राहिले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना विश्रांती घेण्याचे आणि गर्दीत न जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर ते विश्रांतीसाठी त्यांच्या ‘मैत्री’ निवासस्थानी परतणार असल्याचे समजते.
संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या समर्थकांसाठी एक पत्रकही प्रसिद्ध केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते, “सर्व मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांना नम्र विनंती – सध्या प्रकृतीत गंभीर स्वरूपाचा बिघाड झाला आहे, पण उपचार सुरू आहेत. मी लवकरच यातून सावरून नवीन वर्षात पुन्हा आपल्यात येईन. माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि प्रेम कायम राहू द्या.”



