यावल–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे हे संत परंपरेने पावन झालेले गाव पुन्हा एकदा भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. संत सुकनाथबाबा मूर्ती स्थापना वर्धापन दिन व चातुर्मास समाप्ती सोहळा यंदा रविवार, २ नोव्हेंबर रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे. गावातील सुकनाथबाबा मंदिर परिसरात दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार असून पंचक्रोशीतील भाविकांसाठी हा सोहळा अध्यात्मिक उर्जेचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

दीडशे वर्षांपूर्वी समर्थ सुकनाथबाबांनी चुंचाळे येथे २१ वर्षे कठोर तपश्चर्या केली होती. त्यांनी गावातील वयोवृद्धांसाठी शैक्षणिक वर्ग सुरू करून ज्ञानप्रदीप प्रज्वलित केला. त्यांच्या तपश्चर्येने आणि कार्याने चुंचाळे गावाला पावित्र्य लाभले आहे. सन २००० मध्ये समर्थ वासुदेवबाबांनी आपल्या आजा गुरु सुकनाथबाबांच्या पंचधातूच्या २१ किलो वजनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती. योगायोगाने त्याच दिवशी वासुदेवबाबांनी समाधी प्राप्त केली. त्यानंतर त्यांच्या शिष्यवर्गाने आणि भक्तांनी २००१ पासून हा दिवस दरवर्षी “सुकनाथबाबा मूर्ती स्थापना वर्धापन दिन” म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.

सुकनाथबाबांची समाधी वर्डी (ता. चोपडा) येथे आहे, मात्र मूर्ती स्थापना स्थळ चुंचाळे असल्याने मुख्य सोहळा येथील मंदिरातच पार पडतो. या वर्षीच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी अभिषेक व स्नानविधीने होणार असून, त्यानंतर आरती, भजन, भारुड व नामसंकिर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. दुपारी १२ वाजता महाआरती व त्यानंतर दुपारी १ वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.
सुकनाथबाबांनी समाजोन्नतीसाठी आयुष्य वेचले. त्यांनी आदिवासी व गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यांच्या प्रेरणेने उभारलेले शैक्षणिक मंदिर आजही कार्यरत असून, पाचवी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळते. त्यांच्या शिष्यवर्गाच्या आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हे कार्य आजही अखंड सुरू आहे.
या पवित्र वर्धापन दिनानिमित्त श्री सुकनाथबाबा, श्री रघुनाथबाबा आणि श्री वासुदेवबाबा यांच्या शिष्यवर्गाने तसेच चुंचाळे-बोराळे ग्रामस्थांनी सर्व भाविकांना दर्शन, आरती आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. भक्तिभाव, परंपरा आणि समाजसेवेच्या संगमाने चुंचाळे गाव पुन्हा एकदा तेजोमय होणार आहे.



