
चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील मोहरद येथे शनिवारी सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. गावात शेळ्या-बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या एका १७ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. कामरान आमद तडवी (वय १७) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण मोहरद गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कामरान तडवी हा १ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे बकऱ्या चारण्यासाठी घरातून निघाला होता. मात्र, दुपारचे १ वाजून गेले तरी तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी तात्काळ त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कामरान गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मागील बाजूस असलेल्या तारेच्या कुंपणात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
प्राथमिक अंदाजानुसार, या तारेच्या कुंपणात वीज प्रवाह उतरला असावा आणि त्याच तारेचा शॉक लागल्याने कामरानचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कामरानच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेची माहिती मिळताच अडावद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आमद मोहम्मद तडवी यांनी दिलेल्या खबरीवरून अडावद पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची (Unnatural Death) नोंद करण्यात आली आहे. घटनेची पुढील चौकशी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे करत आहेत. या तारेच्या कुंपणात वीज कशी उतरली याचा तपास पोलीस करत आहेत.



