बोदवड – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बोदवड न्यायालयाने डिजिटल न्यायव्यवस्थेकडे ऐतिहासिक पाऊल टाकत आजपासून अधिकृतपणे ई-कोर्ट प्रणालीचा अवलंब केला आहे. या माध्यमातून बोदवड येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालय आता पूर्णतः डिजिटल आणि हाय-टेक बनले आहे. जिल्हा न्यायाधीश ए. एम. शेख यांच्या हस्ते या अत्याधुनिक प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी बोदवड न्यायालयाचे न्यायाधीश ए. पी. खोलम, बोदवड वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील, सचिव ॲड. धनराज प्रजापती, जळगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सागर चित्रे, ॲड. केस इंगळे, ॲड. किशोर महाजन, ॲड. व्ही. पी. शर्मा, ॲड. विजय मंगळकर, ॲड. एन. ए. लढे, ॲड. सी. के. पाटील, ॲड. धीरेंद्र पाल, ॲड. मोहित अग्रवाल यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास तालुक्यातील आणि जिल्ह्यातील वकील व पक्षकार वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.

ई-कोर्ट प्रणाली सुरू झाल्याने बोदवड न्यायालयातील सर्व कामकाज आता अधिक पारदर्शक आणि सुलभ होणार आहे. या प्रणालीमुळे पक्षकारांना त्यांच्या प्रकरणांच्या तारखा, सुनावणीची स्थिती, न्यायालयीन आदेश आणि कार्यवाहीची माहिती मोबाईलवरून थेट पाहता येणार आहे. त्यामुळे जनतेचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचतील.
या प्रकल्पासाठी बोदवड वकील संघाने सातत्याने पाठपुरावा केला होता. जिल्हा न्यायाधीश ए. एम. शेख यांनी सर्वोच्च न्यायालय आणि संगणकीय प्रणाली विभागाशी समन्वय साधून ही प्रणाली बोदवड न्यायालयात यशस्वीपणे लागू केली. या डिजिटल उपक्रमामुळे ग्रामीण न्यायालयीन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश होऊन न्याय वितरण अधिक गतिमान होणार आहे.
वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील यांनी सांगितले, “आज बोदवड न्यायालय जिल्ह्यातील असे पहिले न्यायालय ठरले आहे जिथे ई-फायलिंगची सुविधा सुरू झाली आहे. यामुळे वकील, पक्षकार आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.” सचिव ॲड. धनराज प्रजापती यांनी म्हटले की, “ई-कोर्ट प्रणालीमुळे न्यायालयीन कामकाज जनतेसाठी अधिक पारदर्शक आणि खुलं होणार आहे. हा उपक्रम ग्रामीण न्यायव्यवस्थेसाठी परिवर्तनाचे प्रतीक ठरेल.”
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन बोदवड न्यायालयातील न्यायालयीन व प्रशासकीय कर्मचारीवर्ग, न्यायलीन अधीक्षक वैभव तरटे आणि लीगल एडचे अविनाश राठोड यांच्या सहकार्याने करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांनी डिजिटल न्यायालयीन क्रांतीसाठी बोदवड न्यायालयाच्या टीमचे अभिनंदन केले.
या उपक्रमामुळे बोदवड न्यायालय आता आधुनिक भारताच्या डिजिटल न्याययुगाशी सज्ज झाले असून, ग्रामीण भागातील न्यायालयीन प्रक्रियेला नवसंजीवनी मिळाली आहे.



