सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वाघोदा-थोरगव्हाण जिल्हा परिषद गटातील निवडणुकीसाठी सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा रमेश मोरे या प्रबळ दावेदार म्हणून पुढे आल्या असून त्यांच्या कार्याचा ठसा आज संपूर्ण परिसरात उमटला आहे. महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि हिंसाचाराविरोधात सातत्याने लढा देत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या संघर्षशील आणि धाडसी व्यक्तिमत्त्वामुळे त्या आज अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत.
ज्या ठिकाणी महिलांवर अत्याचार झाले, तिथे प्रतिभा मोरे ह्या स्वतः धाव घेत पोहोचल्या आणि पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. केवळ सहानुभूती दाखवण्यापेक्षा त्यांनी अन्यायाविरोधात ठोस भूमिका घेत आंदोलन, मोर्चे आणि निवेदनांद्वारे आवाज बुलंद केला. पोलिस प्रशासनासमोर ठामपणे मांडणी करून अनेक अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.

महिला प्रश्नांपुरतेच नव्हे, तर गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवरील विविध सामाजिक समस्यांवरही प्रतिभा मोरे यांनी प्रभावीपणे आवाज उठवला आहे. नागरिकांच्या अडचणींचा पाठपुरावा करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्या सदैव पुढाकार घेतात. सामाजिक बदलासाठीची त्यांची बांधिलकी आणि संवेदनशील दृष्टीकोन यामुळे त्यांनी लोकांच्या मनात एक विश्वासार्ह स्थान मिळवले आहे.
सामाजिक कार्याची खरी ओळख म्हणजे लोकांच्या दुःखात सहभागी होणे हा विचार प्रतिभा मोरेंच्या कार्यातून स्पष्टपणे दिसून येतो. त्यांच्या निडर नेतृत्वामुळे आणि लोकाभिमुख दृष्टिकोनामुळे आज त्या वाघोदा-थोरगव्हाण परिसरात एक मजबूत आणि जनतेशी निगडीत महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या दावेदारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



