जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात कौटुंबिक वादातून एका अत्यंत धक्कादायक घटनेत सुनेच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरे आणि मुलाला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे, तर धारदार शस्त्राने वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी (२७ ऑक्टोबर) सकाळी घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव येथे राहणारे प्रकाश उत्तम शिंदे (वय ५०) आणि त्यांचा मुलगा यशवंत शिंदे हे बाळंतपणासाठी जळगावातील सुप्रीम कॉलनी (शारदा शाळेजवळ) येथील माहेरी आलेल्या सून खुशी यशवंत शिंदे यांना घरी घेऊन जाण्यासाठी आले होते.

सोमवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास प्रकाश शिंदे यांनी सून खुशी हिला “आता बाळाला घेऊन घरी चला,” असे सांगितले. याच कारणावरून खुशी शिंदे हिचे माहेरचे नातेवाईक योगेश छबुलाल पाटील, गोलू योगेश पाटील आणि खुशी यशवंत शिंदे हे संतापले. त्यांनी सासरे प्रकाश शिंदे आणि मुलगा यशवंत शिंदे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले.
यावेळी आरोपी गोलू योगेश पाटील याने धारदार शस्त्राने सासरे प्रकाश शिंदे यांच्यावर वार केले, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. तसेच, प्रकाश शिंदे व यशवंत शिंदे यांना मारहाण करण्यात आली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली.
गंभीर जखमी झालेल्या प्रकाश शिंदे यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी प्रकाश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी (२८ ऑक्टोबर) मध्यरात्री १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात योगेश छबुलाल पाटील, गोलू योगेश पाटील आणि सून खुशी यशवंत शिंदे अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव हे करत आहेत.



