Home Cities अमळनेर जुन्या वादातून बाप-लेकास बेदम मारहाण व जीवेठार मारण्याची धमकी

जुन्या वादातून बाप-लेकास बेदम मारहाण व जीवेठार मारण्याची धमकी

0
155

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या मालमत्तेच्या वादातून मनात राग बाळगलेल्या तिघा शेजाऱ्यांनी येथील जानवे गावातील ग्रामपंचायत चौकात एका ६५ वर्षीय वृद्धावर सुतळी फटाका फेकून हल्ला केल्याची धक्कादायक घटना २३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. तसेच त्यांच्यासह त्यांच्या मुलाला लाकडी काठीने बेदम मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी मंगळवारी २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनकर महादू पाटील (वय ६५ वर्ष, धंदा- शेती, रा. जानवे) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यासला आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना २३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता जानवे येथील ग्रामपंचायत चौकात सार्वजनिक ठिकाणी घडली. दिनकर पाटील हे ग्रामपंचायत चौकात बसले असताना, जुने घर विकत घेतल्याच्या कारणावरून त्यांच्यावर राग असलेले शेजारी नारायण पंढरीनाथ पाटील यांनी अचानक सुतळी फटाका पेटवून दिनकर पाटील यांच्या दिशेने फेकला. हा फटाका त्यांच्या उजव्या पायाच्या पोटरीवर पडल्यामुळे त्यांना गंभीर जखम झाली.

दिनकर पाटील हे या कृत्याबद्दल जाब विचारण्यासाठी नारायण पाटील यांच्याकडे गेले असता, त्यांनी दिनकर पाटील यांच्याशी वाद घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून दिनकर पाटील यांचा मुलगा अनिल हा घरातून बाहेर आला. वडिलांसोबत झालेले भांडण आणि फटाका हल्ला याबाबत अनिल यांनी नारायण पाटील यांना जाब विचारला.

यावेळी शांताराम निवा पाटील, नारायण पंढरीनाथ पाटील आणि भरत रामदास पाटील (तिघे रा. जानवे) यांनी एकत्र येत बाप-लेकांना लाकडी काठ्यांनी मारहाण केली. नारायण पाटील यांनी दिनकर पाटील यांच्या छातीवर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, तसेच शिवीगाळ केली. या वादामुळे गल्लीतील संजय महादू पाटील, महेश संजय पाटील आणि भगवाना बापू पाटील यांनी धाव घेऊन भांडण सोडवले आणि बाप-लेकांची सुटका केली. आरोपींनी यावेळी ‘तुम्हाला जिवंत ठेवणार नाही,’ अशी धमकीही दिली. या घटनेनंतर दिनकर पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानुसार तिघांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


Protected Content

Play sound