



दिपनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर फेकरी-साकरी उड्डाणपुलावर बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. राजस्थानहून पत्रे घेऊन नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कंटेनरला अपघात झाला. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कंटेनरच्या केबिनचा चक्काचूर झाला आणि चालक वाहनाच्या पत्र्यांमध्ये अडकून गंभीर जखमी झाला.
घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना या अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक प्रवीण दरेकर यांच्यासह पोलीस पथकाने वेळेचे भान राखून घटनास्थळी धाव घेतली. अपघातात कंटेनरचा पत्रा पिचकल्यामुळे चालक आतमध्ये अत्यंत वाईट स्थितीत अडकला होता. चालकाची सुटका करण्यासाठी पोलिसांनी तत्काळ क्रेन मागवली. क्रेनच्या मदतीने कंटेनरचा भाग उचकटून अथक प्रयत्नांनंतर चालकाला बाहेर काढण्यात यश आले.
गंभीर जखमी झालेल्या चालकाला उपस्थितांच्या मदतीने तातडीने रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. जखमी चालकाची प्रकृती चिंताजनक असून त्याचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, पुलावर झालेल्या या भीषण अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पाहाता पाहाता रस्त्याच्या दोन्ही बाजूला तब्बल दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महामार्गावर निर्माण झालेली कोंडी आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने वाहतूक नियंत्रणाचे काम हाती घेतले. स्थानिक नागरिकांनीही पोलिसांना मोलाचे सहकार्य करत अपघातग्रस्त वाहन बाजूला सरकवण्यासाठी आणि रस्ता मोकळा करण्यासाठी मदत केली. पोलीस आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे तब्बल काही तासांच्या प्रयत्नांनंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात यश आले. या अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



