

भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील मटन मार्केट परिसरातील एका टेलर दुकानात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे १७ हजार रुपये किमतीची दोन शिलाई मशीन चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रफिक खान अशरफ खान (वय ५२, रा. पटेल कॉलनी, भुसावळ) यांचे पाकोजा नावाचे टेलर दुकान मटन मार्केट, आगा खान वाडा, भुसावळ येथे आहे. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून ते २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान ही घरफोडी झाली.
अशी घडली घटना: फिर्यादी रफिक खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्याने त्यांच्या दुकानाच्या पुढील बाजूचे शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर चोरट्याने दुकानाच्या मागील दरवाज्याने पलायन केले. चोरट्याने दुकानातून १० हजार रूपये किंमतीचे शिलाई मशीनी, एन्टर लॉक मशीन असा एकुण १७ हजार रूपये किंमतीचा ऐवज लांबविला. सकाळी दुकान उघडल्यानंतर चोरीचा प्रकार मालकाच्या लक्षात आला.
याप्रकरणी रफिक खान यांच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल २०७७ कांतीलाल केदारे हे करीत आहेत.



