Home क्राईम ब्रेकींग : रस्तालुटीच्या तयारीत असलेले ७ सराईत गुन्हेगार जेरबंद; गावठी पिस्तूल, तलवारी...

ब्रेकींग : रस्तालुटीच्या तयारीत असलेले ७ सराईत गुन्हेगार जेरबंद; गावठी पिस्तूल, तलवारी जप्त


चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरात मध्यरात्री धोकादायक व प्राणघातक हत्यारे घेऊन रस्तालुटीच्या उद्देशाने थांबलेल्या सात सराईत गुन्हेगारांना चोपडा शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी आरोपींकडून गावठी पिस्तूल, तलवारी आणि १३ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, २७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास चोपडा शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना शिरपूर बायपास रोडवर एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये काही संशयित व्यक्ती थांबले असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार तात्काळ पोलीस पथक तयार करून रणगाडा चौकाच्या पुढे, बायपास रोडवर पांढऱ्या रंगाची स्वीफ्ट डिझायर कार (क्र. MH २६ CH १७३३) थांबलेली आढळली.

कारच्या बाहेर दोघे लक्ष ठेवून उभे असलेले आणि आतमध्ये पाच जण बसलेले, असे एकूण सात संशयित पोलिसांना आढळले. पोलिसांना पाहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तात्काळ घेराव घालून सातही आरोपींचा पाठलाग करून त्यांना अटक केली आहे.

झडतीदरम्यान, दोन संशयित आरोपींच्या कमरेला लोड केलेले गावठी कट्टे, गाडीत दोन तलवारी आणि एक रिकामे मॅगझीन मिळून आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दिलीपसिंह पवार, विक्रम बोरगे, अनिकेत सूर्यवंशी, अमनदीपसिंग राठोड, सद्दाम हुसेन (सर्व रा. नांदेड, संभाजीनगर) आणि चोपडा येथील अक्षय महाले व जवेश महाजन या सात नामचीन गुन्हेगारांचा समावेश आहे.

चौकशीत या आरोपींवर यापूर्वी नांदेड, संभाजीनगर (वैजापूर) आणि चोपडा येथे खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दंगल, दहशत माजविणे आणि अग्निशस्त्रे बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींपैकी दोघे नुकतेच MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेतून बाहेर आले आहेत, तर एक आरोपी दरोड्याच्या गुन्ह्यात फरार होता.

या आरोपींची नांदेड परिसरात मोठी दहशत असून, ते शस्त्रांचा धाक दाखवून खंडणी वसूल करणे, खंडणीसाठी अपहरण करणे आणि लोकांचा छळ करून त्यांचे व्हिडिओ तयार करून धमकी देणे अशी कृत्ये करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

सदर आरोपींविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक महेन्द्र रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व पथकातील सपोनि एकनाथ भिसे, पोहेकॉ हर्षल पाटील, पोहेकॉ संतोष पारधी, पोहेकॉ ज्ञानेश्वर जयागे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार, पोलीस कॉन्स्टेबल मदन पावरा, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र मंदे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद पाटील, चालक पोहेकॉ किरण धनगर, पोकॉ योगेश पाटील, पोकॉ प्रकाश ठाकरे यांनी पार पाडली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी हे करत आहेत.


Protected Content

Play sound