Home Cities अमळनेर अमळनेर तालुक्यात वादळी पावसाने हाहाकार; कापूस-मका पिकांचे मोठे नुकसान

अमळनेर तालुक्यात वादळी पावसाने हाहाकार; कापूस-मका पिकांचे मोठे नुकसान


अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यात काल शनिवार सायंकाळपासून सुरू झालेल्या वादळी पावसाने ग्रामीण भागात अक्षरशः हाहाकार माजवला आहे. आज पहाटेपर्यंत सुरू राहिलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली असून, कापूस, मका, ज्वारी आणि सोयाबीन यासारख्या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

काल सायंकाळी आणि आज पहाटेपासून अमळनेर शहरासह परिसरातील अनेक गावांमध्ये वादळासह मुसळधार पाऊस पडला. आधीच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ढासळलेली असताना पुन्हा झालेल्या या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मका, कापूस आणि सोयाबीन ही पिके मोडून पडल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान अधिक वाढले आहे. आधीच बाजारात हमीभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके बांधावर ठेवली होती. मात्र, या पावसामुळे ही पिके पूर्णपणे भिजून गेली असून विक्रीयोग्य राहिली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा मेहनतीचा पैसा आणि परिश्रम दोन्ही वाया जाण्याची शक्यता आहे.

अमळनेर तालुक्यातील मारवड, भरवस आणि वावडे या मंडळांमध्ये काल रात्री व आज पहाटे सुमारे दीड तास मुसळधार पाऊस झाला. काही मिनिटांतच शेतांमधून पाणी वाहू लागल्याने शेतशिवार जलमय झाले. वादळी वाऱ्यामुळे विजेचा पुरवठा दीर्घकाळ खंडित झाला होता, त्यामुळे ग्रामीण भागात अंधार पसरला होता.

खरीप हंगाम नुकताच संपल्याने शेतकरी आता रब्बी पेरणीच्या तयारीत होते. परंतु या अनपेक्षित पावसामुळे पेरणी झालेल्या हरभरा पिकांचेही नुकसान होण्याची भीती शेतकरी बांधवांकडून व्यक्त केली जात आहे. पिकांचे नुकसान पाहता प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

 


Protected Content

Play sound