Home धर्म-समाज इस्लामपूरचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’; केंद्रांची मान्यता, सांगली जिल्ह्याच्या इतिहासातील मोठा टप्पा

इस्लामपूरचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’; केंद्रांची मान्यता, सांगली जिल्ह्याच्या इतिहासातील मोठा टप्पा


सांगली – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । जिल्ह्यातीलइस्लामपूर शहराचे नाव अधिकृतपणे ‘ईश्वरपूर’ असे बदलण्यात येणार आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने १३ ऑगस्ट २०२५ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार, या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून, सर्व्हे ऑफ इंडिया (Survey of India) नेही या बदलाला अंतिम मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे सांगली जिल्ह्याच्या प्रशासनिक आणि सांस्कृतिक इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला आहे.

इस्लामपूर नगर परिषदेने ४ जून २०२५ रोजी ठराव क्रमांक ८२५ अंतर्गत शहराचे नाव बदलण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर केला होता. त्यानंतर या प्रस्तावाची भारतीय सर्वेक्षण संस्थेने स्थळ तपासणी आणि पडताळणी करून शिफारस मान्य केली. तसेच सांगलीचे वरिष्ठ पोस्ट ऑफिस अधीक्षक आणि मध्य रेल्वेचे सहाय्यक विभागीय अभियंता, मिरज यांनी प्रस्तावाला समर्थन देत ना हरकत प्रमाणपत्र (NOC) जारी केले होते.

या सर्व प्रशासकीय प्रक्रियेच्या पूर्णतेनंतर, ‘ईश्वरपूर’ हे नाव देवनागरी आणि रोमन लिपींमध्ये अधिकृतपणे निश्चित करण्यात आले आहे. भारतीय लिपीतील उच्चारांचे अचूक प्रतिबिंब मिळावे म्हणून नावाचे लिप्यंतर डायक्रिटिक्सच्या वापरासह करण्यात आले आहे. पुढील टप्प्यात,राजपत्र अधिसूचना प्रसिद्ध होऊन या नावबदलास कायदेशीर स्वरूप मिळणार आहे.

भारतीय सर्वेक्षण संस्थेने या संदर्भात सूचित केले आहे की, राजपत्र अधिसूचनेची प्रत देहरादून येथील मुख्य कार्यालयासह पुण्यातील महाराष्ट्र आणि गोवा भू-स्थानिक संचालनालयाला पाठविण्यात यावी. याशिवाय, गृह मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, तसेच जयपूर येथील पश्चिम क्षेत्र कार्यालयालाही या निर्णयाची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

स्थानिक नागरिक आणि सामाजिक संस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की ‘ईश्वरपूर’ हे नाव या भागाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पारंपारिक ओळखीचा सन्मान करणारे आहे. अनेक वर्षांपासून ही मागणी केली जात होती आणि अखेर ती केंद्र सरकारच्या मंजुरीमुळे पूर्ण झाली आहे.


Protected Content

Play sound