
चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव वेगाने दुचाकी चालविल्याने झालेल्या भीषण अपघातात चाळीसगाव येथील एका ३३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. खरजई रोड ते घाटरोड दरम्यान चरण पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून, दुचाकी चालकाविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कैलास बापू कोळी (वय ३३, रा. गजाननवाडी, चाळीसगाव) असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, रविंद्र बना जाधव (रा. चाळीसगाव) असे दुचाकी चालकाचे नाव आहे.
फिर्यादी अर्जुन बापू कोळी (वय ३५, मयताचा भाऊ, रा. गजाननवाडी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार, २२ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास त्यांचा भाऊ कैलास हा त्याचा मित्र रविंद्र जाधव याच्यासोबत बजाज प्लॅटिना मोटारसायकल (क्र. MH-५२ A-८७५५) वरून कोदगाव रोडकडून गजाननवाडी येथील घरी परत येत होता. खरजई रोड ते घाटरोड या रोडवर चरण पेट्रोल पंपाच्या पुढे सार्वजनिक ठिकाणी, दुचाकी चालक रविंद्र जाधव याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, अत्यंत भरधाव आणि हयगयीने मोटारसायकल चालवली. यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात कैलास बापू कोळी हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच, दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. आरोपी रविंद्र जाधव याच्या भरधाव आणि निष्काळजीपणामुळेच भावाचा मृत्यू झाल्याची तक्रार अर्जुन कोळी यांनी पोलिसांना दिली आहे. अर्जुन कोळी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रेणी उपनिरीक्षक अरुण बाविस्कर करत आहेत.



