
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव-पाळधी बायपास महामार्गावर गुरूवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातानंतर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाच्या मदतीला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माणुसकीच्या नात्याने धाव घेतली. त्यांच्या या तात्काळ मदतीमुळे तरुणाचे प्राण वाचण्यास मोठी मदत झाली.

पालकमंत्री गुलाबराव पाटील हे गुरुवारी दुपारी जळगावकडे जात असताना त्यांची नजर पाळधी बायपासजवळ रस्त्याच्या कडेला गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका तरुणावर पडली. या तरुणाची दुचाकीही बाजूला पडलेली होती. कोणताही विलंब न लावता पाटील यांनी आपले शासकीय वाहन त्वरित थांबवले.
त्यांनी स्वतः जखमी तरुणाजवळ जाऊन त्याची विचारपूस केली, मात्र तो बेशुद्ध अवस्थेत होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, पाटील यांनी तातडीने तेथून जाणाऱ्या एका खाजगी कारमध्ये त्या तरुणाला कार्यकर्त्यांच्या मदतीने बसवले. वेळेचे महत्त्व ओळखून त्यांनी कार्यकर्त्यांना सोबत पाठवून त्याला त्वरित जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (GMCH) रवाना केले.
इतकेच नाही तर, रुग्णालयात दाखल झाल्यावर तरुणावर योग्य आणि तत्काळ उपचार व्हावेत यासाठी पालकमंत्री पाटील यांनी स्वतः डॉक्टरांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आणि उपचाराच्या सूचना दिल्या. अपघातग्रस्त तरुणाला तातडीने मदत करून, त्याला स्वतःच्या देखरेखीखाली रुग्णालयात पाठवणाऱ्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संवेदनशील कृतीमुळे तरुणाला अत्यंत महत्त्वपूर्ण वेळी वैद्यकीय सेवा उपलब्ध झाली. एका लोकप्रतिनिधीने दाखवलेल्या या तत्परतेचे आणि माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.



