Home क्रीडा सिद्धूंच्या नावाने बनावट पोस्ट व्हायरल; माजी क्रिकेटपटूंचा तीव्र निषेध

सिद्धूंच्या नावाने बनावट पोस्ट व्हायरल; माजी क्रिकेटपटूंचा तीव्र निषेध


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात भारतीय संघासाठी निराशाजनक झाली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभवानंतर भारतीय चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे. याच दरम्यान, माजी क्रिकेटपटू आणि लोकप्रिय समालोचक नवज्योत सिंग सिद्धू सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांच्या नावाने एक खोटं विधान व्हायरल झालं असून, बीसीसीआयला गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांना पदावरून हटवण्याची मागणी त्यांनी केली असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या व्हायरल पोस्टमुळे सिद्धू संतप्त झाले आहे. त्यांनी सोशल मीडियावरच या दाव्यांचा जोरदार निषेध केला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत स्पष्टपणे म्हटलं आहे की, “मी कधीच असं म्हटलं नाही. खोट्या बातम्या पसरवू नका, मला कधीच वाटलं नव्हतं. तुम्हाला लाज वाटायला हवी.” सिद्धूंच्या या स्पष्ट भूमिकेनंतर चाहत्यांमध्ये खळबळ उडाली असून, त्यांनीही अशा बनावट पोस्टविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये सिद्धू यांनी कथितपणे म्हटल्याचं दाखवलं होतं की, “जर भारताला २०२७ चा विश्वचषक जिंकायचा असेल तर बीसीसीआयने तात्काळ अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांना हटवावे आणि रोहित शर्माला पुन्हा कर्णधारपदी बसवावे.” परंतु सिद्धू यांनी हे विधान पूर्णपणे फेटाळून लावले आहे. गेल्या काही काळात सोशल मीडियावर प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाने बनावट विधानं पसरवली जाण्याच्या घटना वाढल्या असून, सिद्धूही त्याचे ताजे उदाहरण ठरले आहेत.

दरम्यान, आज म्हणजेच २० ऑक्टोबर रोजी नवज्योत सिंग सिद्धू आपला ६२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. १९८३ ते १९९९ या काळात त्यांनी भारतीय संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली. क्रिकेटपटू म्हणून दमदार फलंदाजी, नंतर समालोचक म्हणून त्यांची ओळख आणि २००४ पासून राजकारणातही त्यांची इनिंग सुरू झाली. आजही त्यांचा व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव तितकाच कायम आहे.


Protected Content

Play sound