Home Cities जळगाव लेवा गुर्जर समाजाचा भव्य युवक-युवती परिचय मेळाव्याला प्रतिसाद !

लेवा गुर्जर समाजाचा भव्य युवक-युवती परिचय मेळाव्याला प्रतिसाद !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लेवा गुर्जर सेवा प्रतिष्ठान जळगावतर्फे रविवार १९ ऑक्टोबर रोजी शहरात सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात भव्य युवक-युवती परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील तरुण-तरुणींना योग्य जोडीदार निवडण्यासाठी हा मेळावा एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरला. यावेळी प्रमुख राजकीय नेत्यांसह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ ११ वाजता सुरू झालेल्या या मेळाव्यासाठी आपत्ती व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. त्यांच्यासोबत पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता व्ही. डी. पाटील, आर. डी. पाटील, यजुर्वेद्र महाजन, तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष भास्कर सिताराम पाटील, कार्याध्यक्ष विजय हरी पाटील, सचिव विश्वनाथ रामू महाजन आणि सहसचिव सुनील दामोदर चौधरी यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते समाजासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या युवक-युवती परिचय सूची ‘मंगलम’ चे विमोचन करण्यात आले. तसेच, समाजासाठी भरीव योगदान देणाऱ्या देणगीदारांचा सत्कार करून त्यांचे कौतुक करण्यात आले. लेवा गुर्जर समाज बांधवांनी या मेळाव्यात मोठ्या संख्येने हजेरी लावली होती, ज्यामुळे लेवा भवन परिसर गजबजून गेला होता.

मेळाव्यात मार्गदर्शन करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी समाजबांधवांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला. ते म्हणाले, “वधू-वर निवडताना तो किती पैसेवाला आहे किंवा किती मोठा आहे, याचा विचार करण्यापेक्षा, तो निर्व्यसनी असला पाहिजे.” पैशापेक्षा व्यक्तीचे चारित्र्य आणि चांगल्या सवयींना महत्त्व देणे किती आवश्यक आहे, हे पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले.

मंत्री गिरीश महाजन यांनीही समाजातील एकोपा आणि शिक्षणाचे महत्त्व विषद केले. या मेळाव्यामुळे समाजातील तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन मिळाले असून, विवाह जुळवण्याच्या प्रक्रियेला एक विधायक दिशा मिळाली आहे. लेवा गुर्जर सेवा प्रतिष्ठानचा हा उपक्रम समाजासाठी एक आदर्शवत पाऊल ठरला आहे.


Protected Content

Play sound