
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथे “दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६” अंतर्गत दिव्यांगांप्रती संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी एक विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. शासनाच्या विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या एकदिवसीय कार्यशाळेत प्रशासनातील अधिकारी, शिक्षक व विविध क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
ही कार्यशाळा छत्रपती शाहू महाराज सभागृह, जिल्हा परिषद जळगाव येथे पार पडली. दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय मुंबई, दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे आणि जिल्हा परिषद जळगाव यांच्या संयुक्त प्रयत्नांतून या उपक्रमाला आकार देण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा दिव्यांग समन्वय अधिकारी बी. एस. अकलाडे यांनी केले. त्यांनी “दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६” अंतर्गत असलेल्या तरतुदी, विविध शासकीय योजना आणि जिल्ह्यातील दिव्यांग सेवांची माहिती सविस्तर दिली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे यांनी शासनात ४ टक्के आरक्षणाच्या अंमलबजावणीविषयी मार्गदर्शन केले. शिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांनी समावेशक शिक्षण, समग्र शिक्षण अभियान आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणावर प्रकाश टाकला.
डॉ. आकाश चौधरी यांनी UDID कार्ड मिळवण्याची प्रक्रिया, दिव्यांग प्रमाणपत्र आणि आरोग्याशी संबंधित योजनांची माहिती दिली. नाशिक विभागाचे विधी अधिकारी संतोष सरकटे यांनी १९९२ पासून ते RPWD अधिनियम २०१६ पर्यंतच्या कायद्यांचा तुलनात्मक आढावा घेतला. पुणे येथील प्रमुख मार्गदर्शक नंदकुमार फुले यांनी २१ प्रकारच्या दिव्यांगत्वांचे विश्लेषण करताना अधिनियमातील महत्त्वाच्या कलमांची सविस्तर माहिती दिली.
या कार्यशाळेला जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, तसेच विशेष शाळांचे शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेचा समारोप करताना श्री. अकलाडे यांनी सर्व मान्यवरांचे तसेच उपस्थितांचे आभार मानले. दिव्यांगांच्या हक्कांचे संरक्षण व अंमलबजावणीसाठी सजग प्रशासन आणि जागरूक समाजाची गरज लक्षात घेता ही कार्यशाळा अत्यंत उपयोगी ठरली.



