
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) तयारीला लागली असून, पक्षाने आता ‘ऍक्शन मोड’मध्ये काम सुरू केले आहे. जळगाव शहरात पक्षाध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि मनसेचे नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत शहरातील सर्व १९ प्रभागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद दिल्याने, जळगाव महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना जोमाने उतरण्यास तयार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, जळगाव शहरात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल जनतेचा विश्वास वाढत आहे. या वाढत्या विश्वासामुळेच अन्य पक्षांचे अनेक संभाव्य उमेदवार देखील मनसेच्या संपर्कात आहेत. ॲड. देशपांडे यांनी मनसेची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने रस्त्यावर उतरून लढा देणारा, निवेदन आणि आंदोलनांच्या माध्यमातून आवाज उठवणारा एकमेव पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे.”
ॲड. देशपांडे यांनी ठामपणे सांगितले की, आगामी महानगरपालिका निवडणुकीत मनसे सर्व १९ प्रभागांमध्ये उमेदवार देणार आहे. जनतेचा पाठिंबा आणि कार्यकर्त्यांची वाढती ताकद या बळावर मनसे ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहे.
या बैठकीत महानगर अध्यक्ष विनोद शिंदे यांनी वार्ड रचना आणि मतदारयादी संदर्भात आवश्यक माहिती दिली, तर दुसरे महानगराध्यक्ष किरण तळले यांनी निवडणुकीतील पुढील रणनीतीबाबत सखोल मार्गदर्शन केले. बैठकीच्या शेवटी, महानगरपालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांची प्राथमिक चाचपणी सुद्धा करण्यात आली, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला.



