जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना अधिक स्वच्छ, सुसज्ज आणि सन्मानजनक सेवा मिळावी, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आरोग्य मंत्री ना. प्रकाशजी आबिटकर यांच्या हस्ते व आरोग्य राज्यमंत्री ना. मेघनाताई बोर्डीकर यांच्या विशेष उपस्थितीत मुंबई येथून ऑनलाइन पद्धतीने या उपक्रमाचा राज्यभर शुभारंभ करण्यात आला. यामध्ये तीन वेगवेगळ्या रंगांच्या चादरींचा वापर व आधुनिक यांत्रिक प्रणालीद्वारे वस्त्र धुलाई सेवा सुरू करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत राज्यातील सुमारे २९,३१५ खाटांवर व ५९३ शासकीय आरोग्य संस्थांमध्ये ही सेवा लागू करण्यात आली आहे. यामध्ये सोमवार व गुरुवारी पांढऱ्या, मंगळवार व शुक्रवारी हिरव्या, तर बुधवार व शनिवारी गुलाबी रंगाच्या चादरी रुग्णांच्या वापरासाठी वापरण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा उद्देश रुग्णालयांमध्ये स्वच्छतेची पातळी वाढवणे, संसर्गजन्य आजारांचा धोका कमी करणे आणि रुग्णांना अधिक स्वच्छ, नीटनेटके वातावरण मिळवून देणे असा आहे.

या उपक्रमात जळगाव जिल्ह्याचा सहभागही लक्षणीय होता. महिला व बाल रुग्णालय मोहाडी येथे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वतीने आरोग्यदूत मुकुंद गोसावी, ग्रामपंचायत सदस्य सजन भिला राठोड व विजय माणिक गवळी यांच्या हस्ते फित कापून उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करत उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ही सेवा रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार असून, यंत्रणांद्वारे नियमित आणि उच्च दर्जाची धुलाई सुनिश्चित केली जाईल. यामुळे फक्त रुग्णांचीच नव्हे तर आरोग्य संस्थेतील कर्मचाऱ्यांचीही सुरक्षा व स्वच्छतेची पातळी उंचावेल.
या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बाहेकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल दासोरे यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. आरोग्यदूत मुकुंद गोसावी यांनीही आपल्या भाषणातून या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले व अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही सुरू राहावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
एकूणच, राज्यभरातील रुग्णालयांमध्ये रुग्णसेवेच्या दृष्टीने सुरू झालेला हा उपक्रम केवळ स्वच्छतेची नवी व्याख्या ठरत नाही, तर शासकीय आरोग्य व्यवस्थेमधील कार्यक्षमतेचा आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीचा सकारात्मक संकेतही देतो.



