Home आंतरराष्ट्रीय तालिबानचा पाकिस्तानवर जोरदार पलटवार!  ५८ पाकिस्तानी सैनिक ठार 

तालिबानचा पाकिस्तानवर जोरदार पलटवार!  ५८ पाकिस्तानी सैनिक ठार 


काबूल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा ।  पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील सीमावर्ती भागांवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर अफगाण सैन्याने थेट प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या सीमावर्ती चौक्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. तालिबान सरकारने केलेल्या या कारवाईत ५८ पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा करण्यात आला असून, दोन्ही देशांमधील तणाव अधिकच तीव्र बनला आहे. हेलमंड, पक्तिया, खोस्त आणि नांगरहार या सीमेलगतच्या प्रांतांमध्ये पाक-अफगाण सैनिकांमध्ये भीषण चकमकी झाल्याचं वृत्त असून, डुरंड रेषेवरील वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले आहे.

या घडामोडींची पार्श्वभूमी पाहता, ९ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानकडून अफगाणिस्तानच्या काबूल आणि पक्तिका प्रांतांवर रात्री उशिरा हवाई हल्ले करण्यात आले होते. या हल्ल्यांमध्ये नागरी भागांना लक्ष्य केल्याचा आरोप अफगाणिस्तान सरकारने केला होता. या हवाई कारवाईत एक संपूर्ण बाजारपेठ आणि सुमारे ३५ घरांचे नुकसान झाल्याचा दावा केला गेला. या हल्ल्यांनंतर अफगाणिस्तान सरकारने स्पष्ट शब्दांत पाकिस्तानला इशारा दिला होता की, “त्याच्या परिणामांची जबाबदारी पाकिस्तानवर असेल.”

त्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच, ११ ऑक्टोबर रोजी रात्री अफगाण सैन्याने पाकिस्तानच्या डुरंड रेषेवरील चौक्यांवर प्रतिहल्ला केला. तालिबान प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी काबूलमध्ये पत्रकार परिषद घेत पाकिस्तानवर गंभीर आरोप केले. त्यांनी पाकिस्तानवर इस्लामिक स्टेट (ISIS) च्या दहशतवाद्यांना त्यांच्या वायव्य प्रांतात आश्रय दिल्याचा आरोप करत, हे दहशतवादी कॅम्प पाकिस्तान सरकारच्या संरक्षणाखाली चालवले जात असल्याचं म्हटलं.

मुजाहिद यांनी पाकिस्तानला आवाहन केलं की, अशा दहशतवादी घटकांना त्यांनी आपल्या नियंत्रणात ठेवू नये आणि त्यांना काबूल सरकारच्या हवाली करावं. त्यांनी पाकिस्तानला दहशतवादाचा निर्यातदार ठरवत, शेजारील राष्ट्रांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण करणाऱ्या वृत्तीवर रोष व्यक्त केला.

सीमावर्ती भागांतील वाढत्या चकमकांमुळे या प्रदेशात तणाव प्रचंड वाढला असून, दोन्ही देशांचे सैन्य सतर्क झालं आहे. डुरंड रेषेवरील चकमकी, हल्ले आणि द्विपक्षीय आरोप-प्रत्यारोपांमुळे दक्षिण आशियातील शांततेला मोठा धोका निर्माण झाल्याचं जागतिक निरीक्षकांचं मत आहे. या संघर्षामुळे सीमेवर राहणाऱ्या नागरी लोकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा अधिक गंभीर बनत आहे.


Protected Content

Play sound