मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । आगामी छठ पूजा आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते वाराणसी या मार्गावर १२ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे मुंबई आणि उत्तर भारतात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीप्रमाणे, विशेष गाडी क्र. 04225 ही दि. १४ ऑक्टोबर २०२५ ते १८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून सायंकाळी १६.५५ वाजता सुटणार आहे. ही गाडी तिसऱ्या दिवशी पहाटे ०२.०५ वाजता वाराणसी येथे पोहोचेल. तर, विशेष गाडी क्र. 04226 ही गाडी १३ ऑक्टोबर २०२५ ते १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दर सोमवारी वाराणसी येथून पहाटे ०१.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १४.२५ वाजता मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

या गाड्यांना ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापति (भोपाळ), बीना, वीरांगणा लक्ष्मीबाई झांसी, ओराई, कानपूर, लखनौ, सुलतानपूर आणि जौनपूर सिटी या प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील आणि मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
या विशेष गाड्यांची डब्यांची रचना ४ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ९ वातानुकूलित तृतीय श्रेणी आणि २ जनरेटर कार अशी असेल. प्रवाशांना सुविधा आणि आराम मिळावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष डब्यांचे नियोजन केले आहे.
गाडी क्र. 04225 साठी आरक्षण १२ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणार असून, सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर (www.irctc.co.in) तिकिटे उपलब्ध असतील. प्रवाशांनी वेळापत्रक व थांब्यांची अधिक माहिती www.enquiry.indianrail.gov.in या वेबसाइटवर किंवा NTES अॅपवर पाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेले हे प्रसिद्धीपत्रक डॉ. स्वप्नील निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई यांनी प्रसिद्ध केले असून, त्यांनी प्रवाशांना या विशेष गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.



