भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील दिपनगर परिसरात काल संध्याकाळच्या सुमारास एक भीषण प्रकार घडला. सरगम गेट परिसरात उभ्या असलेल्या ओमनी गाडीला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गाडीच्या गॅस किटमधून गळती झाल्यामुळे ही घटना घडली असावी, अशी प्राथमिक शंका व्यक्त करण्यात येत आहे.
ही घटना काल दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. संबंधित ओमनी (MH 05 AJ 2805) सरगम गेट परिसरात उभी असताना अचानक आग लागली. गाडीमधून मोठ्या प्रमाणावर धूर व आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्यामुळे काही क्षणातच संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. यावेळी या महामार्गावरून नागरिकांची व शेतकऱ्यांची मोठी वर्दळ होती. संध्याकाळी अनेक शेतकरी भाजी विक्री करत असतात, त्यामुळे अचानक लागलेल्या या आगीमुळे लोकांमध्ये प्रचंड घबराट उडाली.

घटनेची माहिती मिळताच काही स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने अग्निशमन दलास आणि पोलिस प्रशासनास कळवले. काहीच वेळात अग्निशमन वाहन आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. प्रसंग गंभीर असल्याने पोलिसांनी आग विझवल्यानंतरही काही काळ घटनास्थळी बंदोबस्त ठेवला होता, जेणेकरून नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित होईल.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहन पूर्णतः जळून खाक झालं आहे. गॅस किटमधून गळती झाल्याची प्राथमिक माहिती असून, याबाबत अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. वेळेवर दिलेल्या प्रतिसादामुळे आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.



