जुना वाद उफाळला; चाकूहल्ल्यात तरूणाचा मृत्यू तर दुसरा गंभीर; चार जणांना अटक


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या वादाला नवे वळण देत मलकापूर शहरातील धोपेश्वर परिसरात सोमवारी सायंकाळी दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत चाकूहल्ला होऊन सतीश गजानन झाल्टे (वय २१, रा. पिंप्राळा, ता. मुक्ताईनगर) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्यात त्याचा सहकारी अविनाश जितेंद्र झाल्टे (वय २३) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जळगाव येथील खान्देश रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मलकापूर शहरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मृत सतीश आणि जखमी अविनाश यांचा काही दिवसांपूर्वी मलकापूर येथील काही तरुणांशी धोंगर्डी फाट्यावर वाद झाला होता. सोमवारी सायंकाळी हे दोन्ही तरुण धोपेश्वर मंदिराजवळ एका हॉटेलमध्ये चहा घेत असताना, याच वादातील मलकापूरचे आरोपी तरुण त्या ठिकाणी आले. जुन्या वादावरून त्यांच्यात पुन्हा शाब्दिक चकमक झाली आणि याचे रूपांतर हाणामारी व चाकूहल्ल्यात झाले.

संतप्त जमावाने आरोपींना चोपले:
चाकूहल्ल्यात सतीश झाल्टे गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी हल्लेखोरांपैकी काहींना पकडून बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमराज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मारहाण झालेल्या चार आरोपींना ताब्यात घेतले.

पोलिसांकडून आरोपी ताब्यात:
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये देवा तिलकसिंह राजपूत (२४, रा. सावजी फेळ), संकेत सुनील उन्हाळे (२१), साहिल सुधाकर पालवे (१८) आणि अरविंद अजय साळुंखे (१९) यांचा समावेश आहे. या घटनेत आणखी काही युवक सहभागी असल्याचा संशय असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.