मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्धतेत साजरा करण्यात आला. शंभर वर्षांच्या कार्यप्रवासात संघाने समाज परिवर्तनासाठी केलेले कार्य आणि आगामी काळातील दिशा यावर यावेळी मोलाची चर्चा झाली. या विशेष प्रसंगी जिल्हा महाविद्यालयीन प्रमुख अमोल खलसे यांनी प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन करताना संघाचे अंतिम ध्येय भारताला परमवैभवाच्या शिखरावर पोहोचविणे हेच असल्याचे ठामपणे सांगितले.
उत्सवाची सुरुवात पारंपरिक शस्त्रपूजनाने झाली. त्यानंतर गोदावरी मंगल कार्यालय येथून सुरू होऊन शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून स्वयंसेवकांचे घोष आणि शिस्तबद्ध पथसंचलन पार पडले. इस्कॉन मंदिर, तहसील रोड, परिवर्तन चौक अशा ठिकाणांवरून मार्गक्रमण करत पुन्हा गोदावरी मंगल कार्यालय येथे उत्सवाचा समारोप झाला. शाखेतील स्वयंसेवकांनी यावेळी विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

प्रमुख वक्ते अमोल खलसे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, संघाचे कार्य हे केवळ शाखापुरते मर्यादित नसून ते व्यापक समाजव्यवस्थेला सुसंस्कृत, सुसंघटित करण्याचे कार्य आहे. डॉक्टर हेडगेवारांनी जे कार्य सुरू केले ते हिंदू समाजाच्या आत्मभानासाठी होते. त्यांनी स्पष्ट केले की, इतिहासातील परकीय आक्रमणांमुळे आपला समाज खूपच नुकसान सहन करावा लागला. परंतु, आता समाज अधिक सजग व संघटित होत असून, आगामी आव्हानांचा सामना करण्यासाठी ‘पंच परिवर्तन’ जसे की कुटुंब प्रबोधन, नागरिक कर्तव्य पालन, पर्यावरण संवर्धन, समरसता वाढवणे आणि स्वदेशी जीवनशैलीचा अवलंब करणे, हे अत्यंत गरजेचे आहे.
शताब्दी वर्षानिमित्त संघामार्फत संपूर्ण हिंदू समाजाच्या एकत्रीकरणासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यात हिंदू मेळावे, गृहसंपर्क अभियान, सामाजिक समरसतेसाठी कार्यक्रम अशा प्रकारच्या उपक्रमांचा समावेश असेल. खलसे यांनी उपस्थितांना आवाहन केले की, प्रत्येक स्वयंसेवकाने आणि नागरिकाने या कार्यात सक्रीय सहभाग घेतला पाहिजे, कारण संघकार्य हे केवळ संघाचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे आहे.
कार्यक्रमास ह.भ.प. भाऊराव महाराज पाटील, तालुका संघचालक डॉ. मनोज महाजन, तालुका सहकार्यवाह राजेश पाटील आणि परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. गणवेशधारी स्वयंसेवक, महिला, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. या उत्सवामुळे उपखंडात राष्ट्रप्रेम, समाजभान आणि संघटनाची ऊर्जा निर्माण झाली.
संघाच्या शताब्दी उत्सवाच्या निमित्ताने एकजुटीचा संदेश देत, समाज सशक्त व सुसंघटित करण्यासाठीचे नवसंल्प घेतले गेले. अमोल खलसे यांच्या भाषणाने उपस्थितांत नवा आत्मविश्वास आणि प्रेरणा निर्माण केली.



