मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बॉलीवूड अभिनेता संजय दत्त यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त केलेल्या अभिनंदनपर संदेशामुळे वादंग निर्माण झाले आहे. २ ऑक्टोबर रोजी दत्त यांनी ‘एक्स’ (माजी ट्विटर) वर व्हिडीओ शेअर करून संघाला शुभेच्छा दिल्या. या व्हिडीओमध्ये त्यांनी “संघ नेहमी देशासोबत उभा राहिला आहे, विशेषतः संकट आणि कठीण काळात” असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर व राजकीय क्षेत्रात वादळ उठले आहे.
काँग्रेसला मात्र संजय दत्त यांचे हे समर्थन रुचले नाही. काँग्रेसचे प्रवक्ते सुरेंद्र राजपूत यांनी दत्त यांच्यावर तीव्र टीका करताना म्हटले, “नायक नाही, खलनायक आहे तू. आपल्या वडिलांचा नालायक आहेस तू.” हे वक्तव्य आता जोरदार चर्चेत आले असून संजय दत्त यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

संजय दत्त यांचे वडील सुनील दत्त हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार होते. त्यांची बहीण प्रिया दत्तदेखील काँग्रेसशी जोडलेली आहे. अशा पार्श्वभूमीवर संजय दत्त यांनी परिवाराच्या विचारधारेच्या विरोधात जाऊन RSS चे कौतुक करणे काँग्रेसला धक्कादायक वाटत आहे.
या टीकेवर अद्याप संजय दत्त यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, त्यांच्या भूतकाळातील वादग्रस्त कारकिर्दीची आठवण पुन्हा समोर आणली जात आहे. १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दत्त यांना बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याच्या आरोपावरून TADA कायद्यान्वये अटक झाली होती. नंतर TADA मधून ते निर्दोष ठरले, पण आर्म्स ॲक्टअंतर्गत त्यांना शिक्षा झाली आणि त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता.
संजय दत्त यांच्या RSS समर्थक व्हिडीओमुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे. ‘नायक नव्हे तर खलनायक’ अशी टीका करून काँग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला आहे, तर या संपूर्ण वादावर दत्त यांची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.



