
यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात महावितरण कंपनीने नव्याने बसवलेल्या ‘स्मार्ट मीटर’मुळे वीज बिलांमध्ये मोठी वाढ झाल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयात उपकार्यकारी अभियंता सुहास चौधरी यांना घेराव घातला. माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या नेतृत्वात हे तीव्र आंदोलन करण्यात आले.

शहरातील वाणी गल्लीत असलेल्या महावितरणच्या कार्यालयावर सोमवारी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते. नागरिकांनी आपली जुनी आणि नवीन वीज बिले अधिकाऱ्यांसमोर सादर केली. अनेकांनी कमी वीज वापर करूनही अवाजवी आणि दुप्पट बिले आल्याचा संताप व्यक्त केला.
माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी यावेळी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले की, “शहरात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून बसवण्यात आलेले हे स्मार्ट मीटर अवाजवी फिरत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक मोठ्या प्रमाणात आलेली ही बिले भरू शकत नाहीत. या मीटर संदर्भात नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आहेत.” त्यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला की, “स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवू देणार नाही. महावितरणने हे स्मार्ट मीटर तात्काळ काढून टाकावेत आणि पूर्वीचे जुने मीटर पुन्हा बसवावेत.”
यावेळी नागरिकांनी उपकार्यकारी अभियंता चौधरी यांना निवेदन सादर करत, अवाजवी आलेल्या बिलांच्या संदर्भात तात्काळ मीटरची तपासणी करण्याची मागणी केली. आंदोलकांनी प्रशासनाला इशारा दिला की, स्मार्ट मीटरच्या समस्या त्वरित सोडवाव्यात, अन्यथा याहूनही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. नागरिकांचा संताप आणि वाढता जनआक्रोश लक्षात घेऊन उपकार्यकारी अभियंता सुहास चौधरी यांनी आंदोलकांना स्मार्ट मीटरची तपासणी केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी भरत भोई, जुगल घारू, सागर कोळी, नरेंद्र शिंदे, गोलू माळी, कृष्णा चौधरी, राहुल कचरे सह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.



