पारोळा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल पीक विमा योजनेतील सध्याच्या त्रुटींवर तीव्र नाराजी व्यक्त करत, जुनीच योजना पुन्हा लागू करण्याची जोरदार मागणी केली आहे. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी विभागाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात, सध्याच्या विमा योजनेत शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांचा फायदा अधिक होत असल्याची ठोस टीका करण्यात आली.
या वर्षी जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी, परतीचा पाऊस आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पारोळा, एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव या तालुक्यांतील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही अशी परिस्थिती आहे. मात्र अशा नैसर्गिक संकटानंतर देखील शासनाकडून आवश्यक ती मदत मिळत नसल्याने, शेतकरी संघटना संतप्त झाली आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, पिक विमा योजनेत लावण्यात आलेले नवे निकष अत्यंत जाचक असून, यामुळे विम्याचा लाभ घेणे अशक्यप्राय झाले आहे. पिककापणी प्रयोग, उंबरठा उत्पन्न, इंटिमेशन पद्धती या सर्व बाबी शेतकऱ्यांच्या समजण्यापलीकडे गेल्या आहेत. कंपन्यांचा फायदा जपणारी ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नव्हेच, हेच यातून स्पष्ट होते. त्यामुळे या योजनेचे संपूर्ण स्वरूप बदलण्याची गरज आहे.
वास्तविक, ८७ हजार कोटींपेक्षा अधिक नफा या विमा कंपन्यांनी कमावल्याचे समोर आले असून, त्यात शेतकऱ्यांना फारसा काही लाभ झालेला नाही. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांचा, केंद्र आणि राज्य सरकारचा प्रीमियम कंपन्यांना न देता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.
नवीन योजना जाचक असून जुनी प्रधानमंत्री फसल पिक विमा योजना पुन्हा लागू करावी, आणि कोणतेही निकष न लावता सरळ उत्पादन खर्चाच्या आधारे नुकसानभरपाई द्यावी, अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली आहे. शेतकऱ्यांना केवळ योजनांच्या कागदोपत्री फायदे दाखवून मूळ मदत नाकारली जात आहे, हे अत्यंत गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी विभागाच्या पारोळा कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, तालुकाध्यक्ष प्रा. भिकनराव पाटील, छावा संघटनेचे विजय पाटील, दीपक पाटील, आत्माराम पाटील, नितीन पाटील, रवींद्र पाटील आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते. निवेदन उपविभागीय कृषी अधिकारी सौ. शितल पाटील, सहाय्यक अधिकारी ज्ञानेश्वर जाधव व भामरे यांनी स्वीकारले.



