
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास प्रशाळेअंतर्गत शिक्षणशास्त्र विभागातर्फे पंधरा दिवसांच्या आंतरवासिता उपक्रमाचे उद्घाटन २३ सप्टेंबर रोजी नूतन मराठा शिक्षणशास्त्र विद्यालयात प्राचार्या डॉ. एस. डी. सोनवणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. ८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात एम.एड. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, कौशल्य आणि संस्कार यांचे समन्वय साधणारे विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.

उद्घाटनप्रसंगी बोलताना प्राचार्या डॉ. सोनवणे यांनी अशा उपक्रमांमुळे शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संघटनकौशल्य, आत्मविश्वास, आत्मशिस्त आणि जबाबदारीची भावना विकसित होते असे मत व्यक्त केले. शैक्षणिक क्षेत्रात प्रभावी ठरणाऱ्या शिक्षक घडविण्यासाठी अशा उपक्रमांचे फार मोठे योगदान असते, असेही त्यांनी नमूद केले.
डॉ. स्वाती तायडे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करत उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या आंतरवासिता उपक्रमात प्रशिक्षणार्थींनी अध्यापन प्रात्यक्षिके, सांस्कृतिक कार्यक्रम, गटचर्चा, कार्यशाळा, प्रकल्प यासारख्या विविध कृतींमध्ये सक्रिय सहभाग घ्यायचा आहे. निवास, आहार आणि शिस्त या बाबीही विद्यार्थ्यांनाच स्वयंपूर्णपणे हाताळाव्या लागणार आहेत, यामुळे त्यांच्या व्यवस्थापन क्षमतेत लक्षणीय वाढ होईल.
डॉ. रणजित पारधे यांनी या उपक्रमाचा बहुआयामी दृष्टिकोन स्पष्ट करताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमाइतकेच आंतरवासिता उपक्रमही महत्त्वाचे आहेत. यातून नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव, सहकार्य, संवाद आणि सांस्कृतिक समृद्धी यांचा ठसा विद्यार्थ्यांवर उमटतो.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मनीषा इंदाणी आणि डॉ. संतोष खिराडे यांचे मार्गदर्शन लाभले. या वेळी मंचावर डॉ. एस. बी. पाटील, प्रा. एम. पी. भदाणे, प्रा. एम. बी. मोरे, प्रा. पी. आय. परदेशी, श्री. संदीप वाघ उपस्थित होते. सूत्रसंचालन गंगा चौधरी यांनी केले तर आभार अमिला गावित यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एम.एड. द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या उपक्रमाद्वारे शिक्षक प्रशिक्षणार्थींना ज्ञान, कौशल्य आणि संस्कारांचा त्रिवेणी संगम अनुभवता येणार असून, ते भविष्यात प्रभावी शिक्षक म्हणून समाजात नवी दिशा देण्यास सक्षम ठरतील, अशी अपेक्षा आहे.



