Home Cities जळगाव विद्यापीठात विद्यार्थिनीला मिळणार ‘कै. डॉ. पितांबर सरोदे सुवर्णपदक’

विद्यापीठात विद्यार्थिनीला मिळणार ‘कै. डॉ. पितांबर सरोदे सुवर्णपदक’

0
171

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेतील बी.ए. (हिंदी) विषयात तृतीय वर्षात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनीला आता ‘कै. डॉ. पितांबर चिमण सरोदे सुवर्णपदक’ देण्यात येणार आहे. ज्येष्ठ गांधीवादी, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त साहित्यिक आणि हिंदी भाषेचे प्रचारक कै. डॉ. सरोदे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे सुवर्णपदक देण्यात येणार असून, त्यासाठी नितीन वसंत चिनावलकर यांनी विद्यापीठाला उदार देणगी दिली आहे.

या सुवर्णपदकाच्या स्थापनेमुळे मानव्यविद्या शाखेतील (हिंदी) विद्यार्थिनींना शैक्षणिक क्षेत्रात आणखी प्रोत्साहन मिळणार असून, गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थिनींना सन्मान मिळण्याचा नवा मार्ग खुला झाला आहे. बी.ए. (हिंदी) या शाखेतील अभ्यासात रूची निर्माण व्हावी, विद्यार्थिनींना कलात्मक व सामाजिक जाणीव असलेले संस्कारित व्यक्तिमत्त्व घडावे, यासाठी हा सन्मान प्रेरणादायी ठरेल, असा उदात हेतू चिनावलकर यांनी व्यक्त केला आहे.

या सुवर्णपदकाच्या अनावरणप्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांनी सांगितले की, अशा प्रकारची शैक्षणिक देणगी केवळ गुणवंत विद्यार्थिनींच्या प्रगतीस हातभार लावत नाही, तर शैक्षणिक वातावरणात सकारात्मक स्पर्धा आणि प्रेरणा निर्माण करते. त्यांनी हे सुवर्णपदक विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देणारे असल्याचे सांगितले.

कार्यक्रमावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील, नितीन चिनावलकर, सौ. चिनावलकर, उपवित्त व लेखाधिकारी सोमनाथ गोहिल यांची उपस्थिती लाभली होती. हा उपक्रम भविष्यात इतर दानशूर व्यक्तींनाही शिक्षण क्षेत्रात योगदान देण्यासाठी प्रेरणा देईल, असा विश्वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे.

ही सुवर्णपदक योजना विद्यापीठातील विद्यार्थिनींना केवळ शैक्षणिक यशासाठीच नव्हे तर समाजोपयोगी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठीही एक प्रभावी पाऊल ठरेल. हिंदी भाषेच्या प्रसाराला बळकटी देत विद्यार्थिनींच्या कार्यकौशल्याला योग्य तो गौरव मिळवून देण्याचे हे पाऊल सर्वार्थाने स्वागतार्ह आहे.


Protected Content

Play sound