Home क्राईम संतापजनक : गतिमंद तरुणीवर अत्याचार, नराधमाला अटक !

संतापजनक : गतिमंद तरुणीवर अत्याचार, नराधमाला अटक !

0
153

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गतिमंद असलेल्या एका ४० वर्षीय तरुणीवर मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणात नराधमाला काही तासातच अटक करण्यात आली आहे. याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणी घरात एकटी झोपलेली असताना, इमू उर्फ इम्रान पिंजारी नावाच्या नराधमाने तिच्या घरात प्रवेश केला आणि तिच्यावर अतिप्रसंग केला. दरम्यान, पीडित तरुणीचा भाऊ अचानक घरी आल्याने आरोपीने तेथून पळ काढला. यानंतर पीडितेने घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या आई आणि भावाला सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पीडितेच्या आईने तातडीने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रात्री १० वाजता आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी तात्काळ घटनेची दखल घेऊन चौकशीचे निर्देश दिले.

पोलिसांनी गुन्हा दाखल करताच, शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने युद्धपातळीवर तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी तातडीने पथके रवाना केली आणि रात्री ११ वाजताच्या सुमारास संशयित आरोपी इमू उर्फ इम्रान पिंजारी याला जेरबंद केले.

या घटनेनंतर पीडित तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल करण्यात आले आहे. या घृणास्पद कृत्यामुळे संपूर्ण भुसावळ शहरात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी अशा विकृत मानसिकतेच्या आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची आणि त्याला तात्काळ शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे करीत आहेत.


Protected Content

Play sound